राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) ‘स्वाभिमान सभा’ कोल्हापूरच्या दसरा चौकात पार पडत आहे. या सभेत बोलताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले, अनेकांना त्यांनी (भाजपा) ईडीची भीती दाखवली. मग ते अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील, संजय राऊत असतील, यापैकी कोणी ईडीला घाबरलं नाही. परंतु, आत्ताच आपण बघितलं ईडीच्या नोटीशीचा दम काही नेत्यांना दिला आणि मग त्या नेत्यांची भूमिका बदलली.
शरद पवार म्हणाले, कोल्हापूर हे शूरांचं शहर आहे. या कोल्हापूर नगरीला शौर्याचा इतिहास आहे. त्यामुळे इथं अशी ईडीची नोटीस आली तर हे लोक सामोरं जायची ताकद दाखवतील असं माझ्यासारख्या माणसाला वाटलं होतं. परंतु, इथे काहीतरी वेगळंच घडलं. कोल्हापुरात कोणाला तरी नोटीस आली, कोणाच्या तरी घरी सीबीआयचे लोक गेले, आयकर विभागाचे लोक गेले. मला असं वाटलं की, इतकी वर्ष आमच्याबरोबर काम केलेले हे लोक आहेत, यांच्याकडे काहीतरी स्वाभिमान असेल. परंतु, तसं काही घडलं नाही.
हे ही वचा >> Chandrayan 3 : चांद्रमोहिमेच्या यशामागचे मराठमोळे हात, नांदेडच्या संशोधिकेचं ‘विक्रम’च्या लँडिंगमध्ये मोठं योगदान
शरद पवार म्हणाले यांच्या घरातल्या महिलांनी ईडीला आणि सरकारला सांगितलं, तुम्ही आमच्यावर अन्याय करताय, धाडी टाकताय, यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला. असं एखादी भगिनी बोलू शकते, परंतु, त्या कुटुंबाच्या प्रमुखाने असं काही बोलल्याचं मी काही ऐकलं नाही. त्या कुटुंबप्रमुखाने एकच गोष्ट केली. घरातल्या महिलांसारखं धाडस दाखवायच्या ऐवजी, त्याला वाटलं आपण ईडीच्या दरवाजात जाऊन बसू, भाजपात जाऊ, मग ते म्हणतील तिथं बसू आणि यातून आपली सुटका करून घेऊ. अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली.