शिंदे गटाचे १६ बंडखोर आमदार अपात्र ठरणारच, शिवसेनेला विश्वास; वकिलांनी मांडली कायदेशीर बाजू!

१६ बंडखोर आमदार अपात्र ठरणारच, असा विश्वास शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आहे. त्यासंदर्भात अॅड. देवदत्त कामत यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

shivsena rebel mla disqualification
कोणत्या नियमाच्या आधारावर बंडखोर आमदार अपात्र ठरणार?

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या गटातील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. मात्र, कायदेशीर आधारांवर ही नोटीस तग धरू शकणार नाही आणि संबंधित आमदार अपात्र ठरू शकत नाही, असा दावा बंडखोरांच्या गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीलर आता शिवसेनेकडून यासंदर्भातल्या कायदेशीर बाबी समोर ठेवण्यात आल्या आहेत. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणी शिवसेनेची कायदेशीर बाजू सांभाळणारे वकील देवदत्त कामत यांच्याकरवी कायदेशीर पर्यायांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, यानुसार संबंधित १६ आमदार अपात्र ठरतील, असा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

एखादा सदस्य अपात्र कधी ठरू शकतो?

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार हे शिवसेनेच्या एकूण आमदारांच्या संख्येच्या दोन तृतियांश आहेत. त्यामुळे त्या आधारावर हे आमदार अपात्र ठरू शकत नाहीत, असा दावा बंडखोरांच्या गटाकडून केला जात होता. त्यासंदर्भात आता शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

शिवसेनेला आणखी एक धक्का; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना

“जर दर एखाद्या सदस्याने स्वत:हून पक्षाचा राजीनामा दिला, तर तो अपात्र ठरू शकतो. सभागृहाच्या बाहेरची एखाद्या सदस्याची कृती पक्षविरोधी ठरली, तर त्या सदस्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते”, असं कामत यावेळी म्हणाले. “सध्याच्या प्रकरणात महत्त्वाच्या प्रसंगी शिवसेनेकडून अनेक बैठका बोलावण्यात आल्या होत्या. मात्र, या बैठकांना बंडखोर आमदार हजर राहिले नाहीत. शिवाय, दुसऱ्या राज्यात जाणे, भाजपाच्या नेत्यांशी चर्चा करणे, सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणे हे यासंदर्भातल्या कायद्याच्या परिच्छेद २अ चं उल्लंघन आहे”, अशी माहिती कामत यांनी दिली.

दोन तृतियांश सदस्यसंख्येचा नियम लागू होईल?

दरम्यान, दोन तृतियांश सदस्यांचा गट वेगळा झाल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही, असं म्हटलं जात असलं, तरी त्याबाबत देवदत्त कामत यांनी कायदेशीर बाजू मांडली आहे. “जेव्हा असा गट एखाद्या पक्षात विलीन होतो, तेव्हाच हा नियम लागू होतो. आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारे विलिनीकरण झाल्याचं समोर आलेलं नाही. अपात्रतेच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. २००३ पूर्वी आमदारांना वेगळं होण्यासंदर्भात दोन तृतियांश सदस्यसंख्येचा नियम होता. पण त्यानंतर विलिनीकरणाची अट त्यात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे विलिनीकरण झाल्याशिवाय ते अपात्रतेपासून वाचू शकत नाही”, असं देवदत्त कामत म्हणाले आहेत.

नरहरी झिरवळांवरील अविश्वास प्रस्तावाचं काय?

बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवणारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अशी नोटीस पाठवण्याचे किंवा कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचं म्हणत त्यांच्यावर अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आहे. मात्र, हा ठरावच मुळात अवैध असल्याचं देवदत्त कामत यांनी सांगितलं आहे.

“तुम्ही मला तोतरा म्हणा, टमरेल म्हणा किंवा भ**, पण हिशोब तर द्यावा लागेल”, किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका!

“अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षांना पूर्ण अधिकार आहेत. त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. पण उपाध्यक्षांनी तो प्रस्ताव फेटाळला आहे. कुणीतरी कुरिअरच्या माध्यमातून हा प्रस्ताव देऊन गेल्याचं समजतंय. त्यामुळे तो फेटाळण्यात आला आहे. तसेच, अधिवेशन सुरू झाल्याशिवाय अविश्वास प्रस्ताव मांडला जाऊ शकत नाही”, असं ते म्हणाले.

राज्यपाल अपात्रतेच्या प्रस्तावावर निर्णय घेऊ शकतात?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करोनामधून बरे होऊन नुकतेच राजभवनात परतले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून संबंधित अपात्रतेच्या नोटिसांवर काय कारवाई होऊ शकते? या प्रश्नावर देवदत्त कामत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “अपात्रतेच्या प्रस्तावांमध्ये राज्यपाल कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. यासंदर्भातल्या कार्यवाहीत लवकर निर्णय घेण्याचे निर्देश ते विधिमंडळाला, सरकारला देऊ शकतात. पण निर्णय देऊ शकत नाहीत. राज्यपाल विधिमंडळाचं विशेष अधिवेश बोलावू शकतात. उपाध्यक्षांविरोधातल्या विश्वासदर्शक ठरावासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. मात्र, अद्याप तसं काहीही झालेलं दिसत नाही”, असं कामत यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena rebel mla disqualification notice rules narhari zirwal pmw

Next Story
डिस्चार्ज मिळताच भगतसिंह कोश्यारी अ‍ॅक्शन मोडमध्ये, बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचे दिले आदेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी