सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटन समारंभात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली. अनेक दिवसानंतर आज हे दोघे दिग्गज एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा हे दोघं नेमकं काय बोलणार याकडे लागल्या होत्या, अखेर नारायण राणेंनी केलेल्या भाषणानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली. “जे काही आधी बोलून गेले आहेत विकासाच्या गोष्टी त्या मी परत नाही सांगणार. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो, महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे … माझा समज असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्लातरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाही कोणतरी बोलेल मीच बांधला.” असंही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री भाषणात म्हणाले, “आजचा क्षण मला वाटतं आदळ आपट करण्याचा नाही. तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी मी तुमचं खास अभिनंदन करतोय. कारण तुम्ही इतकं लांब राहून देखील मराठी मातीचा संस्कार विसरला नाही. माती एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीचे असतात, काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू? जोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठ्या सौभाग्याचा दिवस आहे. कारण, शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. अनेकदा मी म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झालं ते शिवसेनाप्रमुख.”

तसेच, “कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी त्या विषयावर बोलायचं तर खूप बोलता येईल, बोलेनही कदाचित पण आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं महाराष्ट्राचे वैभव ही जी संपन्नता आहे. ती आज आपण जगासमोर नेतो आहोत. जगातनं अनेक पर्यटक आणि त्या सुविधांमधला सगळ्या मोठा भाग असतो तो, विमानतळांचा आणि त्या विमानतळाचं लोकार्पण आज झालेलं आहे.” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

विमानतळाबाहेर रस्त्यावरील खड्डे बघायचे का? चिपीच्या उद्घाटनात नारायण राणेंची राज्य सरकारवर तोफ

याचबरोबर “पर्यटन म्हटल्यावर आपल्या समोर साहाजिकच राज्य येतं ते आपल्या शेजारचं राज्य गोवा. आपण गोव्याच्या विरोधातील नाही आहोत. पण आपली जी काय संपन्नता आहे, वैभव आहे, ऐश्वर्य आहे. ते ही काही कमी नाही. काकणभर सरस आहे. कमी तर अजिबातच नाही. मग सुविधा काय आहे तिकडे. एवढे वर्ष विमानतळाला का लागले? एवढी खऱडीघाशी भांडी घाशी का करावी लागली? मग हे सरकार आल्यावर ते कसं मार्गी लागलं? पर्यटन, पर्यंटन, पर्यटन… आजपर्यंत अनेकजण येऊन गेले होते की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू आणि तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटले असं कोकण मी उभं करेन. आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. उर्वरीत गोष्टी आदित्यने व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं. मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेन.” असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून यावेळी लगावल्याचं दिसून आलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhudurg was built by chhatrapati shivaji maharaj who says i built it uddhav thackerays retaliation against rane msr