सोलापूर : सोलापुरात बुधवारी होळीच्या दिवशी होळी पेटत असताना तापमानाचा पारा ४०.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला. यंदाच्या उन्हाळ्यात सुरूवातीलाच तापमान चाळिशी पार करून पुढे गेल्यामुळे सोलापूरकरांची अस्वस्थता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. ३५ अंधांच्या खाली नसलेला तापमानाचा पारा हळूहळू चाळिशीच्या दिशेने सरकत होता. त्याप्रमाणे बुधवारी ४०.८ वर तापमानाची नोंद झाली आहे. सकाळपासून उष्मा अस्वस्थ करीत होता. दुपारी रस्त्यांवरील वाहतूक रोडावली होती. घरासमोर होळी पेटविली जात असताना उष्णतेची धग सतावत होती. दुसरीकडे कडक उन्हाळ्यात मुस्लीम धर्मियांचा सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यात रोजे (निर्जली उपास) करताना रोजेदारांची जणू कसोटी लागत असल्याचे दिसून आले.

अंगाची लाही लाही करणा-या रस्त्यावर पोटासाठी अंगमेहनत करणा-या हमालांसह कष्टकरी वर्गाला वाढत्या उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उष्म्यापासून दिलासा मिळण्यासाठी थंड पेयांसह सरबत, फळांचा रस, ताक, मठ्ठा, लस्सी आदी पेयांचा आधार घेतला जात आहे. रसवंतीची दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. सायंकाळी उद्यानांमध्येही गर्दी वाढली आहे.

बाजारात कूलर, विद्युत पंखे, वातानुकूलित उपकरणांना मागणी वाढली आहे. डोक्यावर टोपी परिधान करणे ही उन्हाळ्यातील अनिवार्य बाब मानली जाते. त्यामुळे बाजारात टोपी, पांढरे गमछे खरेदी वाढली आहे. गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांची खरेदीही वाढली आहे. बाजारपेठांमध्ये व्यापा-यांकडून संयुक्तपणे हिरवे आच्छादन असलेल्या उंच मांडवांची उभारणी केली जात आहे. तर काही मंदिरांच्या आवारात तापलेल्या उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी तापमानरोधक रासायनिक रंगाचे लेपन केले जात आहे.

वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होत असून विशेषतः लहान मुले, वृध्द मंडळी आजारी पडत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या क्लीनिकमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येते. उन्हात अत्यावश्यक असेल तर पुरेशी दक्षता घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature in solapur reached 40 8 degrees celsius on holi festival zws