वाई: वाई पाचगणी महाबळेश्वर रस्त्यालगत घाट रस्त्यावर मोठमोठे जाहिरात फलक उभे राहिले असून त्यांनी पर्यटन स्थळावर मोठे अतिक्रमण केले आहे. हे फलक पर्यटकांच्या गाड्यांवर कधीही कोसळू शकतात. वाईपासून महाबळेश्वरपर्यंतच्या मार्गावर घाट रस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईच्या नोटिशीनंतरही हे फलक संबंधित व्यावसायिकांनी कायम ठेवले आहेत. या जाहिरात फलकांमुळे पर्यटन स्थळाचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे.

मुंबई घाटकोपर येथील जाहिरात फलक पडून झालेल्या दुर्घटनेनंतर पर्यटन स्थळावर ही अनधिकृतपणे उभारण्यात आलेले असे जाहिरात फलक हटवण्यासाठी निसर्गप्रेमींनी कंबर कसली आहे. रस्त्यापासून पाच ते दहा फुटांवर डोंगर टेकडीवर व खोलदरीत फलक उभारण्यात आले आहेत. काही फलक खोल खड्डे काढून उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालकाच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असते. या फलकावर पाचगणी महाबळेश्वर येथील व्यावसायिकांच्या जाहिराती करण्यात आल्या आहेत. महामार्गापासून पर्यटन स्थळाकडे सुरू होणाऱ्या सुरूर महाबळेश्वर रस्त्यावर असे फलक उभारण्यात आले आहेत.

हेही वाचा – सांगली-मिरजेत वळिवाची दमदार हजेरी

पाचगणी महाबळेश्वर ही पर्यटन स्थळे डोंगर सपाटीवर वसलेली आहेत. या परिसरात नेहमीच वेगवान वारे वाहत असतात. मात्र याची कोणतीही काळजी न घेता धोकादायक रीतीने नव्याने हे फलक उभारण्यात येत् आहेत. वाई येथील अनेक सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी निसर्गप्रेमींनी या फलकांच्या उभारणीला आक्षेप घेतलेला आहे. याबाबत अनेकदा शासकीय कार्यालयात तक्रारी करण्यात आल्या आहेत. घाट रस्त्यावर खाजगी जागा मालकांनी आमच्या जागेत आम्ही काहीही करू शकतो असे सांगून रस्त्यापासून तीन ते पाच मीटर अंतरावर असे फलक उभारले आहेत. या जाहिरात फलकांचे पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळे पर्यटन स्थळाचे बकाल पण वाढले आहे.

फलकावर लागलेला पत्रा रस्त्यावर पडून छोटे मोठे अपघात झाले आहेत. वाई व पाचगणी पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वेळोवेळी या जाहिरात फलक उभारणार्‍या व्यक्ती व एजन्सीज कंपन्यांना नोटीस बजावली आहे . पुणे बंगळुरू महामार्गावर मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालकाच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असते. फलकांची देखभाल केली जात नाही, असे जाहिरात फलक धोकादायक ठरतात. सुरूरपासून महाबळेश्वरपर्यंत लागलेले फरक ताबडतोब काढून घ्यावेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

हेही वाचा – सोलापूर : भाडेवसुलीसाठी धमकावल्याने बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या, दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

सातारा शहरात अनधिकृत जाहिरात फलक प्रकरणी पालिकेने जाहिरात एजन्सी फलक मालक यांना ९३ जणांना नोटीस बजावल्या आहेत. ज्या इमारतीवर असे फलक लावलेले आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि पालिकेची परवानगी सादर न केल्यास गुन्हे दाखल करणार येणार आहेत. एका बांधकाम व्यवसायिकाचे दोन फलक जप्त करण्यात आले आहेत. विविध कंपन्या संस्थांकडून शहरात व महामार्गावर मोठ्या प्रमाणात फलक लावले जातात. मात्र त्यांची देखभाल केली जात नसल्याने हे फलक जीवघेणे ठरत आहेत. अशा सर्व फलकांवर कारवाई करण्यात येणार आहे. – अभिजीत बापट मुख्याधिकारी सातारा पालिका

जिल्ह्यातील जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा. शहरी भागात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तर महामार्गावरील स्ट्रक्चरल ऑडीट रस्ते विकास महामंडळाने करावे. स्ट्रक्चरल ऑडीटचे अहवाल येत्या १५ दिवसांत सादर करावे. या कामाला प्राधान्य द्यावे – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा