‘बाहुबलीः द बिगिनिंग’मध्ये कट्टपाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाची उत्सुकता जेवढी प्रेक्षकांना होती, तेवढीच उत्सुकता कालकेय हा महाकाय नक्की आहे तरी कोण? तो कोणती भाषा बोलतो? याबद्दल प्रेक्षकांना होती. बाहुबलीच्या पहिल्या भागातीलही प्रत्येक व्यक्तिरेखा प्रसिद्ध झालेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य भूमिकांसोबतच या सिनेमातील खलनायकाची म्हणजे कालकेयची भूमिकाही प्रचंड गाजली. आधीच्या बाहुबलीमधील कालकेय ‘बाहुबली २’ मध्ये दिसला नाही. असे असले तरीही कालकेय ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. पण कालकेयची भूमिका कुणी साकारली हा प्रश्न आजही प्रेक्षकांना पडतो. त्याचा खरा चेहरा अनेकांना माहिती नाहीये किंवा या अभिनेत्याबद्दल माहिती नाहीये, म्हणून त्याच्याबद्दलची खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

‘बाहुबली’मध्ये कालकेयची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव प्रभाकर. प्रभाकर हा तेलंगणाच्या मेहबूबनगर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहतो. ‘बाहुबली’मध्ये भलेही आपण त्याला भयंकर अवतारात पाहिले असले तरी खऱ्या आयुष्यात तो खूपच लाजरा आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, ‘मला कधीही सिनेमात काम करायचं नव्हतं. पण नशीब मला इथे घेऊन आलं. मला नेहमीच क्रिकेटर व्हायचं होतं.’

आपण जे ठरवतो तसंच घडलं असतं तर प्रत्येक माणूस देव झाला असता, नाही का? प्रभाकरला जरी क्रिकेटर व्हायचं होतं, पण तसं होऊ शकलं नाही. प्रभाकरला त्याच्या एका नातेवाईकाने पोलिसात नोकरी लावून देतो असे सांगितले होते. मात्र, तसेही झाले नाही. या नोकरीची प्रभाकरने तब्बल ६ वर्षे वाट पाहिली. या सहा वर्षांत तो बेरोजगार होता. पण आता काही पोलीस खात्यात नोकरी मिळणार नाही, हे त्याला पुरते कळून चुकले म्हणून तो हैदराबादला येऊन दुसरी नोकरी शोधू लागला.

प्रभाकर आज जे काही आहे त्याचं सारं श्रेय तो एसएस राजमौली यांना देतो. जेव्हा प्रभाकर हैदराबादमध्ये नोकरी शोधत होता तेव्हा राजमौली यांना त्यांच्या ‘मगधीरा’ सिनेमासाठी काही लोकांची गरज होती. त्यावेळी प्रभाकर राजामौलींकडे गेला. राजमौली त्याला राजस्थानला घेऊन गेले. ‘मगधीरा’चं शूटिंग राजस्थानमध्ये सुरू होतं. पण या सिनेमात राजमौलीने प्रभाकरला मोठा रोल दिला नव्हता.

राजस्थानवरून परत आल्यावर प्रभाकर पुन्हा नोकरीचा शोध घेत होता. यादरम्यान त्याला राजामौली यांच्या सहायकाचा फोन आला. तो पुन्हा राजामौलींकडे गेला तेव्हा त्याला ‘मर्यादा रमन्ना’मध्ये भूमिका देण्यात आली. पण प्रभाकरला अभिनय येत नव्हता. त्यामुळे राजामौलींनी त्याला अभिनयाचे धडे घेण्यासाठी पाठवले. सोबतच प्रभाकरला दरमहिना १० हजार रूपयेही दिले.

‘मगधीरा’मध्ये भलेही त्याने काम केले असले तरी प्रभाकर ‘मर्यादा रमन्ना’मधील भूमिकेमुळे अधिक लोकप्रिय झाला. त्यानंतर ‘बाहुबली’मधील कालकेयमुळे तो जास्तच लोकप्रिय झाला. प्रभाकरने आतापर्यंत ४० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baahubali the beginning villain kalakeya real life story