सध्याच्या घडीला अनेक कलाकारांची मुलं बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली असून यामध्येच एक नाव चर्चेत आहे. ते नाव म्हणजे अभिनेत्री जान्हवी कपूरचं. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिने शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातून सध्या तिच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा केली जात आहे. पदार्पणाच्या चित्रपटापासूनच जान्हवीच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इशान खट्टरसोबतची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि त्या दोघांच्याही अभिनयामध्ये असारी परिपक्वता या गोष्टी सध्या त्यांच्या प्रशंसेचं कारण ठरत आहेत.
‘धडक’ या चित्रपटाने जान्हवीच्या वाट्याला बरंच यश दिलं खरं. पण, हा प्रवास तिच्यासाठी दिसतो तितका सोपा नव्हता. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच जान्हवीची आई म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं होतं. तो धक्का पटवत तिने पुढे आपल्या कामावर लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं. आपल्यावरील मायेचं छत्र हरपल्यानंतर नेमकं कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला यावरुन खुद्द जान्हवीनेच ‘फिल्मफेअर’ या प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केला. आईसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करता न आल्याची खंतही तिने व्यक्त केली.
वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा
‘मी तिच्यासोबत जास्त वेळ व्यतीत करु शकले नाही. किंबहुना अनेकदा घरीच थांबून तिच्यासोबत वेळ व्यतीत करण्याची माझी इच्छा असायची. पण, मग कामावरच लक्ष केंद्रीत करण्याला मी प्राधान्य दिलं. कारण याच गोष्टीमुळे आईला जास्त आनंद झाला असता. पण, आता मात्र मला असं वाटतंय की माझ्या या प्रवासात मी तिला सहभागी करुन घ्यायला हवं होतं. बऱ्याच गोष्टी मी स्वत:च्या बळावर करु इच्छित होते, ज्यामुळे आईला फारच आनंद झाला असता’, असं जान्हवी म्हणाली.
हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच जान्हवीच्या कारकिर्दीवर श्रीदेवी जातीने लक्ष ठेवून होत्या. पण, तिच्या पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवी यांचं निधन झालं आणि जान्हवीच्या आयुष्यात एक प्रकरची पोकळी निर्माण झाली.