‘अॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहेत. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात एका अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतलं. तिच्या छोट्याशा भूमिकेचीच सध्या जोरदार चर्चा आहे. या अभिनेत्रीच्या लोकप्रियतेतही एका आठवड्यातच मोठी वाढ झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी होय.
तृप्ती डिमरीने ‘अॅनिमल’ चित्रपटात झोया नावाची भूमिका केली आहे. या चित्रपटामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तिला लोकांचं खूप प्रेम मिळतंय. कोणी तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणतंय तर कोणी तिला ‘भाभी २’ म्हणतंय. यावरही आता तृप्तीने प्रतिक्रिया दिली आहे. “सगळे मला भाभी २ म्हणत आहेत. मी विमानतळावर होते, तिथे चेकिंग करणाऱ्यानेही मला भाभी म्हटलं. मला या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद वाटत आहे. सगळीकडे उत्सवासारखं वातावरण आहे. लोक दोन-तीनदा चित्रपट पाहत आहेत. ते या चित्रपटातील प्रत्येक पात्र लक्षात ठेवत आहेत. ही भावना खूप सुखावणारी आहे,” असं तृप्ती ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना म्हणाली.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तृप्तीचे फॉलोअर्स एका आठवड्यात साडेसहा लाखांवरून तब्बल २.६ मिलियन झाले आहेत. याबद्दल तृप्ती म्हणाली, “माझ्यापेक्षा माझे कुटुंब उत्साही आहे. प्रत्येक वेळी थोडे फॉलोअर्स वाढले की ते मला सांगत असतात.” दरम्यान, या चित्रपटानंतर लोक तिचे ‘बुलबुल’ व ‘कला’ हे चित्रपटही पाहत आहेत, ही खूप चांगली गोष्ट असल्याचं तृप्तीने सांगितलं.