सध्या टेलिव्हीजन विश्वामध्ये नेहमीच्याच मालिकांना काहीसा शह देत एक कार्यक्रम चांगलाच गाजत आहे. तो क्रार्यक्रम म्हणजे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा धम्माल चॅट शो ‘कॉफी विथ करण’. सेलिब्रिटींच्या गप्पा, गॉसिप्स आणि बरिच ‘कॉन्ट्रोवर्शिअल’ गुपितं उघड होणारं हे एक ठिकाण. ‘कॉफी विथ करण’च्या नव्या पर्वाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. बॉलिवूडमधील अभिनेता रणबीर कपूर पासून ते अगदी खिलाडी कुमारपर्यंत सर्वांनीच करणसोबत गप्पा आणि कॉफीची मजा घेतली आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भगामध्ये कलाकारांच्या गप्पा प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन करत आहेत. करणच्या याच लोकप्रिय कार्यक्रमामध्ये लवकरच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हॉलिवूड अभिनेता विन डिझेल हजेरी लावणार आहेत अशी चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडमध्ये नावारुपास आल्यानंतर बी टाऊनच्या या मस्तानीने तिचा मोर्चा हॉलिवूडकडे वळवल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. ‘xXx: रिर्टन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाद्वारे दीपिका सेरेना उनगेरच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरद्वारेही दीपिका आणि विनच्या जोडीला अनेकांनीच पसंती दिली आहे. दीपिकाची विनसोबतची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहता सध्या प्रेक्षकांमध्येही तिच्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रसिद्धीला आता सुरुवात झाली असून भारतातही या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी या चित्रपटाची टीम खास आखणी करत आहे, असे वृत्त ‘डीएनए’ या वृत्तपत्राने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यामुळेच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्येही दीपिका आणि विनची जोडी लवकरच येऊ शकते असे म्हटले जात आहे.

वाचा: दीपिका, रणवीरबद्दल अखेर बोलले प्रकाश पदुकोण

विन आणि दीपिका करणच्या चॅट शो मध्ये येणार का? यासंबंधीच्या विविध चर्चांना सध्या बॉलिवूड वर्तुळामध्ये उधाण आले आहे. १९ जानेवारी २०१७ला हा बहुप्रतिक्षित हॉलिवूडपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दरम्यान, सध्या दीपिका संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone to sip a koffee at karans show with her hollywood co star vin diesel