“शाहीरांनी गायक म्हणून नावारुपास यावं यासाठी लतादीदीही आग्रही होत्या पण…”, केदार शिंदेंनी सांगितली भावूक आठवण

केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे.

“शाहीरांनी गायक म्हणून नावारुपास यावं यासाठी लतादीदीही आग्रही होत्या पण…”, केदार शिंदेंनी सांगितली भावूक आठवण
केदार शिंदे शाहीर साबळे

मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचे नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी शाहीर साबळे यांच्या संदर्भात माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी त्यांचे आजोबा म्हणजे शाहिर साबळे यांनी चित्रपटाची गाणी जास्त का गायली नाहीत, याबद्दल खुलासा केला आहे. शाहीर साबळे यांच्या कन्या आणि लेखिका वसुंधरा साबळे यांनी याबाबत शेअर केलेली ही पोस्ट केदार शिंदेंनी पुन्हा शेअर केली आहे. यासोबत त्यांनी दोन जुने फोटोही शेअर केले आहेत.

“तुझी स्वप्न पूर्ण करण्यात आजही मी तोकडाच पडतोय…”, केदार शिंदेंनी पत्नीसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत

केदार शिंदे यांची इन्स्टाग्राम पोस्ट

“शाहीर आणि चित्रपट पार्श्वगायन….

मराठी चित्रपटसृष्टीशी बाबा (शाहीर) तसे दूरच राहीले..त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना चित्रपटासाठी गाण म्हणायच्या भरपुर ऑफर येत असत पण बाबांनाच मुळात कुठल्याही प्रकारात बंदीस्त व्हायचच नव्हत..लोकगीत आणि प्रहसनं, लोकनाट्य,मुक्तनाट्य या जीवंत प्रकारांमधे ते स्वताला जास्त सहज सादर करु शकत होते पण मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर त्यांचे मीत्र असल्यामुळे त्यांना कुणालाही नकार देण फार अवघड जात असे..

नंतर ते नावारुपाला आल्यावर गाण्यासाठी येणार्या ऑफरना नकार कसा द्यायचा या वीचारात ते पडले..त्याकाळी लता मंगेशकर,आशा भोसले यांचा मराठीतही बराच बोलबाला होता आणि लता मंगेशकर शाहीरांनी इंडस्ट्रीत येऊन गायक म्हणुन बस्तान बसवाव या साठी लता मंगेशकरही अग्रही होत्या पण शाहीरांना त्या वाटेला जायचच नव्हत म्हणुन त्यांनी त्यावेळी गाण्यासाठी सर्वात जास्त म्हणजे ३०० रुपये आकारणार्या लताबाईंपेक्षा जास्त म्हणजे ५०० रुपये फी आकारायला सुरवात केली आणि ही मात्रा बरोबर लागू पडली..इतके पैसे मोजण कुणालाही शक्य झाल नाही..
पण काही मीत्रांच्या अग्रहाखातर त्यांनी मोजकीच गाणी चित्रपटासाठी गायली..पवना काठचा धोंडी मधल ” अंगात भरलय तुफान ” हे ” आम्ही देवा आंबेचे गोंधळी ” हे आणि वावटळ चित्रपटातल ” दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई ” हे भारुड त्यांनी गायल..छोटा जवान या चित्रपटातल एक अप्रतीम मल्हारीगीत त्यांनी सुलोचना चव्हाण यांच्या साथीने गायल पण फक्त ” वावटळ ” या त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या आणि शेवटच्या चित्रपटात श्री.वसंत शिंदे यांच्या बरोबर ” दादला नको गं बाई ” हे भारुड त्यांनी पडद्यावरही स्वताच सादर केल…झटपट प्रसिध्दी आणि पैसा या जंजाळात शाहीर अडकले असते तर नक्कीच महाराष्ट्र अनेक लोकगीतांना मुकला असता एवढ मात्र नक्की..

त्यांनी चित्रपटासाठी आवाज दिलेला त्यांचा शेवटचा चित्रपट होता केदार शिंदेचा ” अगंबाई अरेच्चा ” आणि त्यात अजय अतुलच्या नवीन संगीत संयोजनाखाली त्यांनी एकेकाळी स्वताच गायीलेल गाण ” मल्हारवारी ” हे अजयसह गायल होत आणि त्यावेळी त्यांनी वयाची ऐंशी वर्ष पार केली होती..” असे लेखिका वसंधुरा साबळे यांनी म्हटले आहे.

“मी मागे फिरायचं ठरवत होते पण…”, ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीने सांगितला ‘तो’ थरारक अनुभव

दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुनव्वरला धर्माच्या आधारावर टार्गेट केल्याचा आरोपावर पायल रोहतगी, म्हणाली…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी