आपल्या घायाळ करणाऱ्या अदांनी आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सनी लिओनी सध्या एका वेगळ्या भूमिकेत सर्वांसमोर आली आहे. मुख्य म्हणजे ‘लैला’ आणि ‘बेबी डॉल’ या पार्टी साँग्समुळे चर्चेत आलेल्या सनीने अभिनयासोबतच क्रिकेट सामन्यांच्या कॉमेन्ट्रीची जबाबदारीही पार पाडण्याचं ठरवलं आहे. आयपीएलच्या १०व्या हंगामाची रंगत आणखी वाढवण्यासाठी सनी फारच उत्साही असून तिच्या धमाल कॉमेन्ट्रीला सुरुवातही झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील ग्रोवरसोबत क्रिकेट सामन्याचा हालहवाल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी सनी आता तर थेट क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागसोबतच कॉमेन्ट्री बॉक्सचा ताबा घेणार आहे. ‘यूसी न्यूज’ या अॅपसाठी सनी आणि वीरेंद्रची ही शाब्दिक फटकेबाजी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मुख्य म्हणजे आपल्या अफलातून फलंजादीने क्रीडा रसिकांची मनं जिंकणारा वीरेंद्र सेहवाग त्याच्या हजरजबाबीपणासाठीसुद्धा ओळखला जातो. त्याच्या ट्विटर अकाऊंटपासून ते अगदी विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या त्याच्या ट्विट्सपर्यंत सर्व काही अफलातूनच असतं. तेव्हा आता कॉमेन्ट्री बॉक्समध्ये सेहवागचं वर्चस्व दिसणार की, सुपरक्यूट सनी त्याच्यावर मात करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या सामन्याची कॉमेन्ट्री देण्यासाठी सनी आणि सेहवाग फारच उत्सुक आहेत.

दरम्यान, ‘यूसी न्यूज’च्या कॉमेन्ट्रीआधी सनीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत एका क्रिकेटपटूचं नाव सुचवण्याचं आवाहन चाहत्यांसमोर ठेवलं होतं. सनीच्या या ट्विटनंतर वीरेंद्र सेहवागनेही ट्विट करत त्याच्या अंदाजात सनीसोबत कॉमेन्ट्रीसाठी आपण तयार असल्याचं स्पष्ट केलं. तेव्हा आता सनी आणि वीरुपाजींच्या धमाल ‘मसाला कॉमेन्ट्री’मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन होतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2017 actress sunny leone challenges cricketer virendra sehwag commentary box