दाक्षिणात्य अभिनेता यशची देशभरात चर्चा आहे. ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ २’ या दोन चित्रपटातून तो यशाच्या शिखरावर पोहचला आहे. या चित्रपटात यश ‘रॉकी भाई’च्या भूमिकेत दिसला आहे. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांनी बंपर कमाई केली. या दोन्ही चित्रपटानंतर त्याच्या फॅन फॉलॉइंगमध्ये वाढ झाली आहे.
यश आपल्या डायलॉगसाठी जसा प्रसिद्ध आहे तसाच तो चाहत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. अलीकडेच, बंगळुरू येथे आयोजित एका कार्यक्रमात, यशने एक दोन नव्हे तर तब्बल ७०० चाहत्यांना सेल्फी दिला आहे. दरम्यान, यशच्या दयाळू आणि प्रेमळ हावभावाचे बंगळुरूमधील त्याच्या चाहत्यांनी खूप कौतुक केले जे त्याला एक झलक पाहण्यासाठी लांबून आले होते. अनेक चाहत्यांनी या कार्यक्रमाची झलक ट्वीटवर शेअर केली आहे.
यशने त्याच्या कारकिर्दीची जवळपास आठ वर्षे या ‘केजीएफ चित्रपटांसाठी दिली आहेत. या चित्रपटाच्या पुढील भागाबद्दल इंडिया टुडेशी बोलताना यश म्हणाला की, हो आमच्या डोक्यात तिसऱ्या भागाची संकल्पना आहे. पण मला आता काहीतरी वेगळे करायचं आहे. जर गोष्टी जुळून आल्या तर तिसऱ्या भागाला लवकरच सुरवात करू. अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली.