अभिनेत्री किशोरी गोडबोले(Kishori Godbole) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेकविध कारणांमुळे अभिनेत्री सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी किशोरी गोडबोलेच्या लेकीची ॲपलच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी निवड झाल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता अभिनेत्रीचे एका मुलाखतीत केलेले वक्तव्य चर्चेत आहे. करिअर पीकला असताना काम करणं का बंद केलं होतं, शूटिंग सूरू असताना घरच्यांना कसा वेळ देते, याबरोबरच करिअर करताना सासरच्यांचा कसा पाठिंबा होता, यावर अभिनेत्रीने वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाठिंबा आपल्याला कमवावा लागतो…

अभिनेत्री किशोरी गोडबोलेने नुकतीच लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीला करिअर करताना सासरच्या लोकांचा कसा पाठिंबा होता? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “पाठिंबा आहे आणि घरच्यांचा पाठिंबा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पाठिंबा आपल्याला कमवावा लागतो, आपोआप मिळत नाही. म्हणजे माझी काम करण्याची पद्धत किंवा माझी वागणूक बघून त्यांच्याही मनात कुठेतरी आत्मविश्वास निर्माण झाला की किशोरी जे करतेय ते खूप चांगल्या पद्धतीने करतेय, त्यामुळे मला पाठिंबा मिळाला. बाबांच्या घरची कलेची पार्श्वभूमी होती. कलेची पार्श्वभूमी असलेली सून घरात आहे, हे त्यांना माहीत होतं. फक्त काय होतं की शूटिंगच्या वेळा नसतातच, शूटिंगच्या अवेळा असतात, त्यांनी तेसुद्धा खूप ॲडजेस्ट केलं.”

शूटिंग सुरू असताना घरच्यांना वेळ देण्याबाबत किशोरी गोडबोलने म्हटले, “घरालाच कायम प्राथमिकता होती. जेव्हा माझ्याकडे खूप काम होतं. ॲड फिल्म, हिंदी टीव्ही मालिका, मराठी-हिंदी चित्रपटांत काम करत होते, हे सगळं सुरू असताना जेव्हा सईची दहावी- बारावीची परीक्षा होती, तेव्हा तीन वर्ष मी सगळं काम हातातलं बाजूला ठेऊन घरी होते. प्राथमिकता नुसतं म्हणत नाही, माझं घर माझी प्राथमिकता आहे. त्यामुळे मी म्हटलं ना, पाठिंबा मिळणं आपल्या वागण्यावर खूप अवलंबून असतं आणि म्हणूनच टेलिव्हिजन मालिका केल्या की मुंबईत शूटिंग असतं. त्यामुळे संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतर सात ते आठ वाजता आपल्या घरी, आपल्या परिवाराबरोबर राहता येत.

दरम्यान, किशोरी गोडबोले सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकविध विषयांवरील व्हिडीओमधून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishori godbole reveals why she quit acting for 3 years while having so many projects nsp