Suraj Chavan Viral Engagement Reel Video : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं होतं. नुकताच मुख्य अभिनेता म्हणून सूरजचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झापूक’ सिनेमात सूरजने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली. सूरजच्या अभिनयाचं त्याच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं.

मात्र, सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सूरज काहीसा नाराज झाला होता. पण, आता थोड्याच दिवसांत सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रिय होऊन सूरजने पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. सध्या तो पुन्हा चर्चेत येण्याचं कारणही तेवढंच खास आहे ते म्हणजे साखरपुड्याचा व्हायरल व्हिडीओ…हा व्हिडीओ नेमका काय आहे? यामागचं सत्य काय? जाणून घेऊयात…

सूरज चव्हाणच्या अकाऊंटवरून शनिवारी ( ३१ मे ) रात्री एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. यामध्ये सूरज सूट घालून एकदम डॅशिंग लूकमध्ये तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. तो गाडीतून उतरून पाहुण्यांच्या घरी जातो. याठिकाणी त्याचं सन्मानाने स्वागत करण्यात येतं. यानंतर एक मुलगी काहीशी लाजत साडी नेसून सूरजला पाणी द्यायला येते. यावेळी बॅकग्राऊंडला ‘मखमली’ हे रोमँटिक गाणं ऐकू येत आहे. यानंतर सूरजची बहीण या मुलीला हळदी-कुंकू लावते, तिची गळाभेट घेते. पुढे, दोघंही एकमेकांना अंगठी घालतात आणि त्यांचा साखरपुडा होतो असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

सूरजचा हा व्हिडीओ पाहून आणि “अखेर आनंदाचा दिवस उजाडला…” हे कॅप्शन वाचून अनेकांना त्याचा साखरपुडा झाला असा गैरसमज झाला आहे. पण, मूळ ट्विस्ट या व्हिडीओच्या शेवटी आहे. सूरजचा साखरपुडा होतो पण, तो स्वप्नात…! व्हिडीओच्या शेवटी सूरज घरात झोपलेला दिसतो यानंतर त्याची बहीण येते आणि त्याला झोपेतून उठवते. यावर सूरज म्हणतो, “कसलं भारी स्वप्न पडलं मला…” यावरून सूरजचा साखरपुडा वगैरे झालेला नाहीये हा केवळ मजेशीर व्हिडीओ आहे हे स्पष्ट झालं आहे.

सूरजचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा गोंधळून गेले आहेत. अनेकांनी त्याचं अभिनंदन सुद्धा केलं आहे पण, संपूर्ण व्हिडीओ पाहणाऱ्या युजर्सनी “सूरजने सर्वांना गुलीगत धोका दिला” अशा कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस मराठी’मधील त्याची सहस्पर्धक अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने, “घाबरले मी दोन मिनिटांसाठी” अशी मजेशीर कमेंट सूरजचा व्हिडीओ पाहून केली आहे.