India’s Most Expensive Web Series: नाटक, मालिका तसेच चित्रपट या माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. वर्षानुवर्षे ही माध्यमे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. काळानुसार मनोरंजनाच्या साधनातदेखील बदल होताना दिसत आहेत.
ओटीटी या माध्यमाने त्याचे स्थान प्रबळ केले आहे. ओटीटी माध्यमामुळे जगभरात प्रदर्शित होणारे चित्रपट घरबसल्या पाहण्याची सोय झाली आहे. याबरोबरच, वेब सीरिज हा प्रकार मोठा लोकप्रिय ठरताना दिसत आहे. अनेक कलाकारांना ओटीटीमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे.
सर्वात जास्त बजेट असलेली ‘ही’ आहे वेब सीरीज
अनेकदा काही चित्रपट तयार होतात, मात्र ते कधीही प्रदर्शित होत नाहीत, असे ऐकायला मिळते. आता अशीच वेब सीरिज तयार झाली. मात्र, ती कधीही प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. महत्वाचे म्हणजे, या वेब सीरिजचे बजेटदेखील कोट्यवधी होते. ही वेब सीरिज नेमकी कोणती होती. त्याचे बजेट काय होते आणि ती का प्रदर्शित झाला नाही, याबद्दल जाणून घेऊ.
‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने २०१८ ला एका वेब सीरिजची घोषणा केला होती. आनंद नीलकंठन यांच्या ‘द राइज ऑफ शिवगामी’, ‘चतुरंगा’ आणि ‘क्वीन ऑफ महिष्मती’, या कांदबऱ्यांवर आधारित एक वेब सीरिजची घोषणा केली होती. ‘बाहुबली: बिफोर द बिगिनिंग’ असे या वेब सीरिजचे नाव होते. बाहुबली चित्रपटाचा प्रिक्वेल म्हणजेच त्याच्या आधीचा भाग या वेब सीरीजमध्ये दाखवण्यात येणार होता. एस एस राजामौली यांनी या वेब सीरिजची निर्मिती केली. देवा कट्टा आणि प्रवीण सत्तारू हे दिग्दर्शक होते. याचे सुरुवातीचे बजेट हे १०० कोटी होते.
तरुण शिवगामीचा प्रवास यामध्ये दाखवण्यात येणार होता. ती कटप्पाला कशी भेटते आणि बिज्जलदेवाशी का लग्न करते हे या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार होते. तरूण शिवगामीच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसणार होती.
करोनामुळे या शोचे शूटिंग थांबले. ‘बॉलीवूड हंगामा’नुसार, आधी जे शूटिंग झाले होते, ते नेटफ्लिक्सने रद्द केले आणि नव्याने शूटिंगला सुरुवात केली. ज्यामध्ये मृणाल ठाकूरच्या जागी वामिका गब्बीला प्रमुख भूमिकेत कास्ट करण्यात आले. निर्माती टीम बदलण्यात आली. कुणाल देशमुखच्या खांद्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी दिली. २०० कोटींचे बजेटसह शूटिंगला सुरुवात झाली.
पुढे दिग्दर्शक कुणाल देशमुखने या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. असे म्हटले जाते की २०२४ मध्ये या वेब सीरिजचे शूटिंग बंद करण्यात आले.तोपर्यंत याचा एकूण खर्च ३०० कोटी झाला होता. हा खर्च ‘बाहुबली:द बिगिनिंग’ या चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त होता. बाहुबलीचे बजेट २५० कोटी इतके आहे. इतकेच नाही, तर अलीकडे ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘पठाण’,’पुष्पा: द राइज’ या चित्रपटांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. कारण ‘पठाण’चे २२० कोटी तर पुष्पा:द राइजचे २५० कोटी इतके बजेट आहे.