‘‘राजा परांजपे हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठीतील फार महत्त्वाचे दिग्दर्शक होते. त्यांनी सामाजिक आणि नैतिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट बनवले आणि ते चित्रपट व्यावसायिकदृष्टय़ाही यशस्वी ठरले. हा ताळमेळ मी अजूनही शोधू शकलेलो नाही,’’ अशी भावना प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘राजा परांजपे प्रतिष्ठान’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘राजा परांजपे महोत्सव’च्या उद्घाटनप्रसंगी गोवारीकर यांच्यासह अभिनेते जितेंद्र जोशी, अभिनेत्री मेधा मांजरेकर, गायक महेश काळे यांना ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी गोवारीकर बोलत होते. प्रतिष्ठानच्या विश्वस्त अर्चना राणे आणि अजय राणे या वेळी उपस्थित होते.

गोवारीकर म्हणाले, ‘‘विणकाम करताना ‘एक धागा सुखाचा’ गाणारा माणूस ही राजा परांजपे यांची छाप माझ्या मनावर कोरली गेली आहे. लहानपणी त्यांचे ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’ हे चित्रपट मला आवडायचे, परंतु हे चित्रपट कुणी बनवले हे तेव्हा मला माहीत नव्हते. ‘जिवा सखा’ या चित्रपटात मी रमेश देव यांच्याबरोबर अभिनय करत होतो. तेव्हा ते राजाभाऊंचा नेहमी गुरू म्हणून उल्लेख करत. मी चित्रपट बनवायला लागल्यावर इतर चित्रपटांचा अभ्यास करताना ‘जगाच्या पाठीवर’ पाहून खूप प्रभावित झालो.

राजा परांजपे यांचे चित्रपट पाहताना प्रत्येक वेळी काहीतरी नवे गवसते.’’

‘खूप मोठे काम करूनही आपण काहीच केले नाही, असे राजाभाऊ दाखवत. त्यांचा पडद्यावरील सहज वावर प्रेक्षकाला आतपर्यंत जाऊन भिडतो,’ असे डॉ. आगाशे यांनी सांगितले. जितेंद्र जोशी म्हणाले, ‘‘सध्या इतके पुरस्कार दिले जातात, की प्रत्येक कलाकाराला आपण मोठे झालो, असे वाटू लागते.

‘दिग्गज’ हे विशेषण ऐकून घाबरायला होते, परंतु राजा परांजपे यांच्यासारखे लोक खरे दिग्गज आहेत. पुरस्कार सोहळे पुष्कळ असतात, परंतु अशा व्यक्तीच्या नावाने होतो तो खरा सन्मान.’’ पुरस्कार सोहळ्यानंतर मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सर्व कलाकारांची मुलाखत घेतली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raja paranjape important marathi director in independence period