स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका संवेदनशील कवयत्री म्हणून ओळखली जाते. छोट्या पडद्यावरच्या अनेक भूमिकांमधून स्पृहा घराघरांत पोहोचली. ‘लोपामुद्रा’ या आपल्या काव्य संग्रहानंही ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. तिच्या कृतीतूनच तिचे समाजभान वेळोवेळी समोर येत असतात. आज अनेक कलाकरांच्या घरी गणपती बाप्पाचे आगम झाले आहे. त्यातच स्पृहानेदेखील तिच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली. मात्र तिने स्थापना केलेला बाप्पा हा ‘ट्री गणेश’ आहे.
स्पृहाच्या गावी गणपती बसतो. त्यामुळे अनेक वेळा तिला गावी जाणे शक्य होत नाही. यंदा प्रथमच स्पृहाने इको फ्रेंडली गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. आपल्या परीने निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागावा म्हणून तिने ट्रीगणेशाचे पूजन केले आहे. गणरायाच्या ह्या इको फ्रेंडली मूर्तीत एका रोपट्याचे बीज असल्याने १५ दिवसांनंतर त्यातून रोप उगवणार आहे.
‘माझ्या घरी गणपती बसत नाही. माझ्या गावी गणपती बसतो. मला दरवर्षी गावी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे यावेळी मी ठरवलं आपल्या घरीच छोटीशी मूर्ती आणून बाप्पाची प्रतिष्ठापना करायची. म्हणून मी ट्रीगणेशाची स्थापना केली. दररोज मी या बाप्पाल पाणी घालणार आणि १५ दिवस सतत पाणी घातल्याने त्यातून छान असे रोपटे तरारुन येणार आहे. मला ही कल्पना फार आवडली आहे. मला असे वाटते की गणेशोत्सव साजरा करण्याची ही सुंदर पद्धत आहे’ असे स्पृहा ट्री-गणेशाची प्रतिष्ठापना केल्यावर म्हणाली.
ट्री गणेश म्हणजे काय?
ट्री गणेशा म्हणजे एक इको फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती. ही बाप्पाची मातीची मू्र्ती तयार करताना त्यामध्ये काही बीया टाकल्या जातात. दरम्यान हा बाप्पा तयार करण्यासाठी वापरली जाणारी मातीदेखील रोपट्यासाठी पूरक असते. या गणेश मूर्तीची स्थापना एका कुंडीमध्ये करण्यात येते. त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीवर पाणी ओतून कुंडीमध्येच विसर्जन करण्यात येते. १५ दिवस सतत मूर्तीवर पाणी ओतल्यानंतर त्यामधून रोप बाहेर येते.