‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. घराघरात अत्यंत आवडीने हा शो पाहिला जातो. या शोचे लाखो चाहते आहेत. विनोदाचं अचूक टायमिंग साधत कलाकार प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत ठसा उमटवणारी अभिनेत्री ईशा डे हास्यजत्रेतूनच घराघरात पोहोचली.
हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळवलेली ईशा सोनी मराठीवरील ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेतही झळकली होती. या मालिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. परंतु, अवघ्या तीनच महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिका बंद झाल्यानंतर ईशाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने “प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. पण प्रत्येक गोष्टीचा शेवट हा नवीन सुरुवात घेऊन येत असतो,” असं कॅप्शन इंग्रजीमधून दिलं आहे.
हेही वाचा>> अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची बॉलिवूड अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला “हे पोस्टर पाहून…”
ईशाने शेअर केलेल्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. “मराठी कलाकार समाजमाध्यमांवर व्यक्त होताना इंग्रजी का वापरतात कुणास ठाऊक? इतका संकोच वाटत असेल का? तुमची पोस्ट पाहणारे ९०-९५% लोकं मराठी आहेत. बघा पटलं तर घ्या, बाकी तुमची इच्छा, ” असं चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे. चाहत्याच्या या प्रश्नावर अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे.
“संकोच वाटत असता तर मराठी भाषेमध्ये काम तरी का केला असत सर? Also my language of expression is usually English आणि मला त्याचा ही संकोच वाटत नाही. बरं आणि माझी Post पाहणारे ९०-९५ % लोक मराठी आहेत हे तिम्ही कसं ठरवलं ह्याची मला कल्पना नाही. P.s. तुम्ही मराठी/देवनागरी मध्ये लिहलेला “पोस्ट” हा शब्द पण इंग्रजी भाषेतला आहे.” असं ईशाने म्हटलं आहे.
हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ईशाने लंडनहून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकांमध्ये ती झळकली होती.