दिवंगत अभिनेते मोहन गोखले(Mohan Gokhale) यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत अनेक उत्तम मालिका व चित्रपटांत काम केले. ‘मिस्टर योगी’ या मालिकेतून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. मोहन गोखले यांनी ‘हिरो हिरालाल’, ‘मोहन जोशी हाजीर हो’ यांसारख्या अनेक सिनेमांत त्यांनी साकारलेल्या भूमिका अजरामर केल्या. मात्र, वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आजही त्यांच्या अभिनयाविषयी बोलले जाते. त्यांचे लग्न अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्याबरोबर झाले होते. त्यांना सखी ही मुलगी आहे. आता सखी गोखलेने एका मुलाखतीत वडिलांविषयी वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सखी वडिलांबद्दल काय म्हणाली?

सखी गोखलेने ‘व्हायफळ’ या पॉडकास्टला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत मोहन गोखलेंविषयी बोलताना सखी म्हणाली, “माझा बाबा आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडला गेला होता, पण त्याला पाश्चात्य संस्कृतीदेखील आवडत असे. त्याला बीटल्स आवडायचे. त्याला मॅड मॅगझीन आवडायचं, त्यामुळे लहानपणी आमच्या घरी भीमसेन आण्णांचं संगीतही सुरू असायचं. त्याचबरोबर वेस्टर्न जाझ, बीटल वगैरेसुद्धा सुरू असायचे.” पुढे सखी म्हणाली, “तो जेवढं आयुष्य जगला, त्या आयुष्यात त्याने ज्या प्रकारचं काम केलं; मला असं वाटतं की मी इतकी भाग्यवान आहे की ते माझे वडील आहेत. अजूनही अनेक ठिकाणी मला चांगलं लेखलं जातं, कारण मी त्याची मुलगी आहे.”

सखी गोखलेने या मुलाखतीत तिच्या बालपणाविषयी, शाळेविषयी तसेच तिच्या वाचनाच्या सवयीबाबतही वक्तव्य केले. याबरोबरच आई शुभांगी गोखलेबरोबरचे नाते कसे आहे, यावरही सखीने दिलखुलास संवाद साधला. आईचं जग तिच्याभोवती फिरतं. आईने मैत्रिणीप्रमाणे अनेकदा सांभाळून घेतले आहे, तसेच तिच्यासाठी धाडसी निर्णय घेतले आहेत. एकटेपणा, दु:ख यापेक्षा आईने आनंदाला महत्त्व दिल्याचे सखी म्हणाली. याबरोबरच सखीने तिचा पती सुव्रत जोशीबाबतही वक्तव्य केले आहे. सुव्रत हा देखील अभिनय क्षेत्रात काम करतो.

सखी गोखले ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या मालिकेतून घराघरांत पोहोचली. ही मालिका मैत्रीवर आधारित होती. अमेय वाघ, सुव्रत जोशी, स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर, पूजा ठोंबरे यांच्याबरोबर सखी गोखले प्रमुख भूमिकेत दिसली होती. रेश्मा ही तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडल्याचे पाहायला मिळाले होते. आता सखी व सुव्रत एका नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘वरवरचे वधू वर’ या नाटकातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sakhi gokhale express her feelings about late father mohan gokhale says i am so lucky that he is my father nsp