स्टार प्रवाह मालिकेतील सर्वच मालिका या घराघरात लोकप्रिय आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. या वाहिनीवरील मुरांबा ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत येणाऱे नवनवीन ट्विस्ट, रमा-अक्षयची खुलत जाणारी प्रेमकहाणी यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. नुकतंच या मालिकेतील एका अभिनेत्याने रिल लाईफबद्दलच्या दिवाळीबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
अभिनेता विपुल साळुंखे हा मुरांबा या मालिकेत आनंद मुकादम ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. विपुल साळुंखे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही शेअर करत असतो. नुकतंच त्याने मुरांबा या मालिकेतील दिवाळी कशापद्धतीने साजरी होत आहे? याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या बालपणीची आठवणही सांगितली आहे.
विपुल साळुंखेची पोस्ट
“पुर्वी शाळेत होतो तेव्हा दिवाळीच्या सुट्टीत कधी एकदा गावी जातोय आणि दिवाळी साजरी करतोय असं व्हायचं…
ते गावाकडचं घर, दारात भल्यामोठ्या रांगोळीसाठी सडा-शिंपण करुन शेणाने सारवुन स्वच्छ केलेलं अंगण त्याच्या बाजुलाच किल्ल्यासाठी लागणार्या खास कुरणात जाऊन आणलेली भुसभुशीत चॉकलेटी आणि लाल रंगाच्या मातीचा ढीग रचलेला असायचा, आधी मोठाली दगडी व्यवस्थित रचुन त्यावर सुग्रासच्या (पशुखाद्य) पोत्यांचा मुलामा चढवला जायचा आणि मग त्यावर आधी चॉकलेटी आणि नंतर लाल मातीचा थर थापायचा, गावातल्या हॉस्पिटलमधुन पाईपसकट सलाईनच्या बाटल्या आणायच्या त्याचे नीट नियोजन करुन किल्ल्याभोवती जी गव्हाची मोहरीची शेतं असायची तिथे सलाईनच्या सुयांनी ठिबक सिंचन आणि जी बाग असायची तिथे कारंजे बनवायचो मग सगळी चित्रं मांडायची (गावाकडं शिवबाराजं, त्यांचं मावळं, गुरं, हत्ती-घोडे, तोफा ह्यांच्या मातीच्या मुर्त्यांना “चित्रं” म्हणत).
मग संध्याकाळी किचनमधुन कानवलं (करंजी) तळतानाचा घमघमाट सुटायचा त्याच वेळेला गुरांच्या धारा पण काढल्या जायच्या एकिकडे कढईत कानवलं तळली जायची दुसरीकडे मोठ्या टोपात जाड साई येईस्तोवर खरपूस दूध तापवलं जायचं…मग काय आम्ही सगळी भावंडं परातीतल्या पाच-सहा गरमागरम करंज्या उचलायचो वाटीत दूध घ्यायचो आणि पार टाळ-जिभ भाजेस्तोवर हां हूॅं करत त्यावर यथेच्छ ताव मारायचो. तो कार्यक्रम आटोपला कि मग आज्जी-आजोबांभोवती गलका करत बसायचो आणि मग त्यांच्याकडुन गेल्यावर्षी सांगितलेल्या त्याच “गोष्टी” पुन्हा नव्याने ऐकायचो… मग आज्जी पण आम्हा सगळ्यांवरुन हात फिरवत कडाकडा बोटं मोडत आमची दृष्टं काढायची आणि म्हणायची, “बया मपल्या ह्या गोकुळाला कुनाचीच नजर नगं लागायला…!!!”
हे सगळं आज सांगण्याचा हाच उद्देश्य होता, कारण सध्या स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या आमच्या “मुरांबा” ह्या मालिकेत आम्ही सगळेच हे क्षण पुन्हा एकदा नव्याने जगतोय, रील भावंडं असुनही रियल भांवडांसारखं आम्ही नुस्ता कल्ला करतोय सेटवर, कारण यंदा आम्ही मुकादम्स आमची दिवाळी आमच्या गावी साजरी करतोय… तुम्हालाही आमची ही “गावकडची दिवाळी” कशी वाटतेय ते नक्की कळवा”, अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
दरम्यान त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या दिवाळीच्या आठवणी सांगितल्या आहेत. सध्या विपुल आणि स्मिता शेवाळे यांची मुरांबा मालिकेतील जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. यापूर्वी विपुलने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतही काम केलं आहे. तसेच पावसा आणि रंग तुझा या गाण्यातही विपुल दिसला आहे.