Star Pravah : संपूर्ण देशभरात सध्या विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ता छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. विकी सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. आता लवकरच अभिनेता ‘स्टार प्रवाह’च्या एका लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे. विकीचे सेटवरचे फोटो नुकतेच प्रेक्षकांसमोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत सध्या ‘श्री आणि सौ’ या अनोख्या स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता असतानाच जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे. हा खास पाहुणा म्हणजे सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल. विक्की कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच सिनेमाच्या निमित्ताने विक्कीने ‘घरोघरी मातीच्या चुली’च्या सेटवर खास हजेरी लावली होती.

सध्या मालिकेत ‘श्री आणि सौ’ ही स्पर्धा जिंकण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश अतिशय जिद्दीने प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. जानकी-ऋषिकेशला प्रोत्साहन देण्यासाठी विक्कीने खास टिप्स दिल्या आहेत. खेळ असो नाहीतर लढाई… हिंमत कधी हरायची नाही. खेळ जर जिंकायचाच असेल तर गनिमी काव्याने सुद्धा जिंकता येतो. लढाई आपल्या माणसांच्या भरोशावर लढायची असते. आपल्या टीमला एकत्र घेऊन लढायची असते आणि जगात नवरा-बायकोपेक्षा भारी टीम दुसरी कुठलीच नसते. तेव्हा जिद्दीने लढा द्या असा कानमंत्र देत विक्कीने जानकी-ऋषिकेशला शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर ‘छावा’ सिनेमा पाहण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

जानकी-ऋषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे विक्कीबरोबरचा शूटिंगचा दिवस कायम स्मरणात ठेवतील. सुरुवातीला विक्कीबरोबर काम करण्याचं त्यांच्या मनात दडपण होतं. मात्र त्यांनी हे दडपण दूर केलं. खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. मराठी भाषेवर त्यांचं विशेष प्रेम आहे. मालिकेतला सीन मराठीमध्ये असल्यामुळे त्यांनी शूटिंग सुरु होण्यापूर्वी संपूर्ण टीमशी संवाद साधला. मालिकांचं शूट नेमकं कसं होतं, उच्चार कसे असायला हवे अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. आम्हा सर्वांसाठीच ही फॅन मोंमेट होती अशी भावना रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांनी व्यक्त केली.

Star Pravah

दरम्यान, विक्की कौशलचा हा खास भाग प्रेक्षकांना ७.३० वाजता ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तर, येत्या १४ फेब्रुवारीपासून सर्वत्र ‘छावा’ चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vicky kaushal enters in the star pravah show shares first photo from the set sva 00