प्राणीसंग्रहालय निर्मितीसाठी आज सामंजस्य करार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानातील प्राणीसंग्रहालयाचा कायापालट करण्यात येत असतानाच, मुंबई महापालिकेने आता गोरेगाव येथील आरे वसाहतीतही आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरे वसाहतीत ‘राणीची बाग’ वसवण्याचा प्रकल्प अनेक वर्षांपूर्वी आखण्यात आला होता. परंतु, मधल्या काळात बासनात गुंडाळला गेलेला हा प्रकल्प पालिकेचे नवीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पुनरूज्जीवित केला आहे. राज्य सरकारचा वन विभाग व महापालिका यांच्या एकत्रित प्रयत्नाने सुरू होणाऱ्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या वनविभागाशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. बुधवार, ५ जून रोजी पर्यावरण दिनी हा करार करण्यात येणार आहे. पालिका मुख्यालयात सकाळी साडेअकरा वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व  अर्थ व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे.

राज्य सरकारच्या सहकार्याने पालिकेने आरे वसाहतीत प्राणीसंग्रहालय सुरू करण्याचा प्रकल्प आखला होता. मात्र जिजामाता उद्यान आरे वसाहतीत हलवण्याचा हा घाट असल्याचा कांगावा करीत काही राजकीय पक्षांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. जिजामाता उद्यानाची मोक्याची जागा विकण्याचे घाटत असल्याचाही आरोप त्या वेळी करण्यात आला. त्यामुळे आरे वसाहतीतील प्राणीसंग्रहालयाचा हा प्रकल्प मागेच राहिला. आता आयुक्तपदावर नव्याने आलेल्या प्रवीण परदेशी यांनी हा प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्याचे ठरवले आहे. त्याकरिता त्यांनी हा जुना प्रस्ताव पुनरुज्जीवित केला आहे. आरे वसाहतीत प्राणीसंग्रहालय विकसित करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि पालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठीचा मसुदा राज्य सरकारकडे सन २०१४ मध्ये पाठवण्यात आला आहे. मात्र तो अद्याप मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यामुळे हा करार करून पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता पालिका प्रशासनाने स्थायी समितीची मंजुरी मागितली आहे. आरे वसाहतीतील प्रस्तावित प्राणीसंग्रहालय हे जिजामाता उद्यानाचा विस्तारित भाग असल्याचेही प्रशासनाने या प्रस्तावात स्पष्ट केले आहे.

पश्चिम उपनगरातील लोकांना प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी थेट भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापर्यंत यावे लागते. मात्र तेथील रहिवाशांसाठी उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी आरे कॉलनीत हे प्राणीसंग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. शिक्षण आणि मनोरंजन अशा दोन्ही हेतूने हे प्राणीसंग्रहालय उभे राहणार असून केवळ मनोरंजनावर भर न देता दुर्मीळ वन्यजीवांच्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन केंद्र म्हणून तसेच निसर्ग शिक्षण केंद्र म्हणून हे प्राणीसंग्रहालय साकारले जाणार आहे.

राज्य सरकार आणि पालिका यांच्यात करार केल्यानंतर ९९ वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपया भाडेतत्त्वावर ही जागा पालिकेला हस्तांतरित करण्यात येईल. या जागेचा मालकी हक्क मात्र राज्य सरकारकडेच राहणार आहे. जागा हस्तांतरित केल्यापासून ४ ते ५ वर्षांत प्राणीसंग्रहालयाचा विकास करण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेची राहणार आहे, तर प्राणीसंग्रहालयातून येणारा निव्वळ महसूल पालिका व राज्य सरकार यांनी ठरावीक प्रमाणात वाटून घ्यायचा आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी ५०० कोटींचे मूल्य पालिकेने अंदाजित केले आहे.

नाईट झू सफारी

जीवसृष्टीत मोठय़ा संख्येने असलेल्या निशाचर प्राण्यांचे व सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करता यावे यासाठी सिंगापूर येथील प्रसिद्ध नाईट सफारीच्या संकल्पनेवर आधारित नाईट झू सफारी विकसित करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarey colony zoo jijamata udyan