मुंबई : वांद्रे येथील रिक्लेमेशन परिसरातील इमारतीमधील सदनिकेत ६४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला असून वृद्ध महिलेचे हातपाय बांधून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. हात, पाय बांधून शस्त्राने गळ्यावर व डोक्यावर वार करून महिलेची हत्या करण्यात आली असून घरातील दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेच्या परिचित तरुणाला दोन तासात पोलिसांनी अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वांद्रे परिसरातील रिक्लेमेशन डेपो परिसरातील कांचन इमारत क्रमांक १३ मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत ६४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. ओढणीने महिलेचे हात, पाय बांधून शस्त्राने त्यांचा गळ्यावर वार करण्यात आले होते. चार – पाच दिवसांपूर्वीच महिलेची हत्या करण्यात आली होती. तसेच महिलेच्या घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. रेखा अशोक खोंडे असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्या गळ्यावर गंभीर जखमा आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह भाभा रुग्णालयात नेण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रिक्लेमेशन गेट क्रमांक दोन येथील कांचन इमारत क्रमांक १३ ए विंगमधील २२ क्रमांकाच्या सदनिकेत महिलेचा मृतदेह सापडला. घरातील सर्व वस्तू व दरवाजाची पाहणी केली असता आरोपी घरात जबरदस्तीने शिरलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी महिलेच्या परिचित व्यक्तीचाच सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या माहितीच्या आधारे महिलेचा परिचित शारीफ अली समशेर अली शेख (२७) याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भाभा रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या गळ्यावर गंभीर जखमा आहेत. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून महिलेची हत्या करण्यात आलेल्या शस्त्राची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused arrested within two hours in bandra area for murder of elderly woman mumbai print news amy