ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख उपस्थिती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या यंदाच्या पर्वाचा सांगता सोहळा आज, बुधवार, ३० ऑक्टोबरला रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी मदतीचे धनादेश संस्थांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात येतील.

विविध क्षेत्रांत विधायक कामे करणाऱ्या संस्थांची ओळख करून देणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे यंदाचे नववे पर्व. या नऊ वर्षांत दानशूरांनी ९२ संस्थांना मदतीचा हात देत त्यांच्या कार्याला भक्कम पाठबळ दिले.

या उपक्रमांतर्गत यंदा गणेशोत्सवादरम्यान १० संस्थांची माहिती ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्यात महापुरामुळे नुकसान झालेले सांगली जिल्हा नगर वाचनालय, धरणफुटीनंतर ग्रामस्थांना आधार देणारे तिवरे येथील न्यू इंग्लिश स्कूल, सर्वसामान्यांची रुग्णसेवा करणारे किनवटमधील सानेगुरुजी रुग्णालय, अमरावतीतील शाश्वत कन्सेप्ट स्कूल, वंचित- गरिबांच्या मुलांसाठी आधारवड ठरलेले स्नेहवन, पन्हाळ्यातील नवशिक्षण प्रसारक मंडळ, संगीत प्रसार करणारी स्वरांकित, बदलापुरातील अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम- पाणवठा, नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड, ठाण्यातील वसुंधरा संजीवनी मंडळ या संस्थांचा समावेश होता.

दर वर्षीप्रमाणे यंदाही वाचकांनी मोठे आर्थिक पाठबळ देत विधायक कार्यासाठी या संस्थांचे हात बळकट केले आहेत. या दानयज्ञाची सांगता बुधवारी समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. सोहळ्यात या संस्थांच्या प्रतिनिधींकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहेत.

कधी? : आज, ३० ऑक्टोबर, दुपारी ३.३० पासून

कुठे? : मिनी थिएटर, रवींद्र नाटय़ मंदिर,

सिद्धिविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor dilip prabhavalkar akp