इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबईमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेतर्फे साडेपाच हजार आशा सेविकांची नेमणूक करण्यात येणार असून त्याकरीता विवाहित असण्याची अट घालण्यात आली आहे. ही अट जाहिरातीत नसली तरी कुटुंबनियोजनाच्या साधनांची माहिती देताना अविवाहित आशा सेविकांना त्रास असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर ही अलिखित अट घालण्यात आल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत सुमारे ५ हजार ५७५ आशा आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. गृहभेटीद्वारे प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आशा सेविकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ‘कामावर आधारित मोबदला’ या तत्त्वावर त्यांची कंत्राटी नेमणूक केली जाणार असून त्यांना दरमहा सहा हजार रुपयांपर्यंत मानधन देण्यात येणार आहे. मात्र त्याकरीता शिक्षण आणि वयाच्या अटीबरोबरच विवाहित असण्याची अट असून अविवाहित महिलांची निवड केली जाणार नसल्याची माहिती पसरवण्यात येत असल्याचे समजते. आरोग्य विभागाने या भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आशा सेविकांची वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे या दरम्यान असावी आणि त्यांनी किमान १० वी पर्यंतचे औपचारिक शिक्षण पूर्ण केलेले असावे. त्यांच्याकडे  नेतृत्व गुण आणि समुदायाशी संवाद साधण्याचे कौशल्य असावे. महत्वाचे म्हणजे इच्छुक आशा स्वयंसेविका उमेदवार या संबंधित विभागातील शक्यतो जवळ निवासस्थान असणाऱ्या असाव्यात अशा अटींचा समावेश आहे. महिला विवाहित असावी अशी अट लेखी जाहिरातीत नसली तरी विवाहित महिलांच्या निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांचे अर्ज महापालिकेच्या ए ते टी विभाग कार्यालयांमध्ये ३१ मार्चपर्यंत स्वीकारण्यात येतील. अर्जाचा नमुना विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) यांच्याकडे मिळू शकेल. सद्यस्थितीत साधारण १ हजार ०८८ आशा सेविका, तर २ हजार ८०० आरोग्य सेविका मुंबई महापालिकेअंतर्गत कार्यरत आहेत. आरोग्य खात्याची गरज लक्षात घेता, आरोग्य केंद्रात १ हजार ते १२०० लोकसंख्येसाठी व अंदाजे २५० घरांसाठी एक अशा पद्धतीने या आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात येणार आहे. आशा सेविकांना प्रामुख्याने वस्ती पातळीवर गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असेल. विविध आजारांचे रूग्ण, गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी असेल. विवाहित महिला असली तर कुटुंब नियोजन, गरोदर माता यासंबंधीच्या विषयांवर संवाद साधणे सोपे जाते त्यासाठी ही अट आहे. घटस्फोटित, परित्यक्ता, विधवा अशा महिलांनाही या कामासाठी निवडले जाईल. – डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc to recruit 5500 married asha workers to provide primary health care facilities mumbai print news zws