लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मीरा रोड येथे जानेवारीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे, गीता जैन आणि तेलंगणाचे आमदार टी. राजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या नेत्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिल्याने हिंसाचारातील दोन पीडितांसह मुंबईतील पाच रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मीरा रोड येथील अल्पसंख्याक वस्तीत २१ जानेवारी रोजी हिंसाचार उसळला होता आणि संपूर्ण शहरात त्याचे पडसाद उमटले. त्याच वेळी, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गीता जैन यांच्यासह मीरा रोडच्या काही भागांना भेट देऊन अल्पसंख्याक समाजाला धमकावले.

आणखी वाचा-संक्रमण शिबिरांना कंटाळलेल्या गिरणी कामगारांची सुटका कधी ? चाळी मोडकळीस, पुनर्विकास रखडलेला

तसेच राणे यांनी गोवंडी आणि मालवणी परिसरालाही भेट देऊन तिथे प्रक्षोभक भाषणे केली, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. तर तेलंगणाचे आमदार टी. राजा यांनी २५ फेब्रुवारी रोजी मीरा रोड येथील सभेमध्ये जातीय टिप्पणी केल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून आमदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची विनंती केली, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे, याचिका केल्याचा दावादेखील याचिकाकर्त्यांनी केला आहे.

अशा प्रक्षोभक भाषणांप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. प्रक्षोभक भाषण करणाऱ्या व्यक्तीच्या धर्माचा विचार न करता देशातील धर्मनिरपेक्षता कायम राखण्यासाठी आमदारांविरोधात कारवाई केली पाहिजे. त्यामुळे, न्यायालयाने राणे, जैन आणि राजा या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.