मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना आरामदायी आणि उत्तम रेल्वे प्रवास घडावा यासाठी नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्या स्थानकात लोकल पोहोचत आहे, धीमी की जलद लोकल आहे, याबाबत माहिती देणारे पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसविण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये मोटरमन आणि गार्ड बसतात त्या ठिकाणी लोकल कुठे जात आहे, याची माहिती देण्यात येते. तसेच लोकलच्या आतमधील डिस्प्लेद्वारे लोकलचे मार्गक्रमण समजते. मात्र, लोकलच्या बाहेरील बाजूस अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे मुंबईकरांसाठी मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या लोकलला नवीन ‘हेड कोड डिस्प्ले’ बसविण्यात आला आहे. यावर प्रवाशांना लोकलच्या गंतव्यस्थानाची स्पष्ट आणि त्वरित माहिती मिळेल. लांबपल्ल्यांच्या गाड्यांप्रमाणेच लोकलला डिस्प्ले लावण्यात आले आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>>म्हाडाच्या भूखंडावरील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास अखेर सुरुवात; विलेपार्ले येथील फलक आज हटवणार

तीन भाषांमध्ये माहिती

लोकलच्या गार्डने लोकलचा क्रमांक यंत्रणेत नमूद केल्यानंतर तत्काळ प्रवासाचे सर्व तपशील लोकलच्या बाहेरील बाजूच्या पॅनोरामा डिजिटल डिस्प्लेवर अचूकपणे दिसतील. डिजिटल डिस्प्ले तीन सेकंदांच्या अंतराने भाषा बदलून इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये लोकलचे गंतव्यस्थान दर्शवेल. तसेच जलद-धीमी, १२ डबे-१५ डबे याबाबतची माहिती डिस्प्लेद्वारे दिली जाईल. पाच मीटरपर्यंतच्या अंतरावरूनही हे डिस्प्ले प्रवाशांना दिसून येतील.

हेही वाचा >>>धारावी पुनर्वसनासाठी आतापर्यंत सव्वातीनशे एकर अतिरिक्त भूखंड!

सध्या एका लोकल रेकमध्ये डिस्प्ले सिस्टीम बसवण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रत्येक बाजूला चार डिजिटल डिस्प्ले असलेले एकूण आठ डिजिटल डिस्प्ले आहेत. त्यावर प्रवासाबाबतची आवश्यक माहिती तपशीलवार उपलब्ध होईल. भविष्यात इतर रेकमध्येही डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहेत. – विनित अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.

कोणत्या रेल्वेला डिस्प्ले?

मुंबईकरांसाठी सध्या मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या लोकलला नवीन ‘हेड कोड डिस्प्ले’ बसविण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digital display on west local railway mumbai print news amy