मुंबई : गणेश विसर्जन आणि ईद एकाच दिवशी आल्याने पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेता ईदच्या मिरवणुका शुक्रवारी काढण्याचा तोडगा काढण्यात आला. यानुसार राज्यात ईदची सुट्टी ही गुरुवारऐवजी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. परिणामी गुरुवारपासून सोमवापर्यंत सलग पाच दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टय़ांचा आनंद लुटता येणार आहे
उद्या गुरुवारी गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशीची सुटी आहे. त्याच दिवशी ईद ए मिलादचा सण असल्याने दोन्ही सणांची होणारी गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे, यासाठी शुक्रवार २९ सप्टेंबरला ईद ए मिलादची शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ऑल इंडिया खिलाफत समितीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती.
या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस शेख, माजी मंत्री नसीम खान आदींचा समावेश होता. अनंत चतुर्दशी आणि ईदच्या मिरवणुका एकाच दिवशी निघाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टी मिळणार आहे. गुरुवारी अनंत चतुर्दशी, शुक्रवारी ईद, शनिवार व रविवारची साप्ताहिक तर सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असेल. राज्य शासनाने ईदची सुट्टी बदलल्याने बँका आता शुक्रवारी बंद राहतील.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ, विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.