प्रसिद्ध वाद्यवादक आणि संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे बुधवारी पहाटे हिरानंदानी रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. गणेशोत्सवात हमखास कानी पडणारे ‘अशी चिकमोत्याची माळ’ हे प्रसिध्द गाणे निर्मल मुखर्जी यांनी अरविंद हळदीपूर यांच्याबरोबर संगीतबद्ध केले होते. विविध पाश्चिमात्य वाद्यांवर हुकूमत असलेल्या निर्मल यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच वादक म्हणून सुरुवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी  लेखी सूचना पाठविण्याचे मुंबईकरांना आवाहन

निर्मल मुखर्जी यांचे वडील चित्रपट निर्माते होते. त्यांच्या मालकीचा बसंती म्युझिक हॉल दादर परिसरात होता. या हॉलमध्ये तेव्हाचे अनेक गाजलेले संगीतकार गाण्याचे ध्वनिमुद्रण करण्यापूर्वी सराव करत असत. त्यावेळी त्यांच्या होणाऱ्या चर्चा, गायन- वादन यांचा प्रभाव निर्मल यांच्यावर पडला. पुढे वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी सिने म्युझिक असोसिएशनचे सदस्यत्व घेतले. वादक म्हणून त्यांची सुरुवात वयाच्या दहाव्या वर्षी एका वाद्यवृंदाच्या माध्यमातून झाली. हाजरा सिंग यांच्या वाद्यवृंदात ते बोंगो वाजवत असत. पुढे लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांच्या चमूत त्यांनी स्थान मिळवले. त्यांच्या विशिष्ट वादनामुळेच पुढे राहुल देव बर्मन, राजेश रोशन, कल्याणजी-आनंदजींसह अनू मलिक, जतिन-ललित ते थेट विशाल-शेखर या संगीतकारांकडे ते वादक झाले होते. केवळ निरीक्षणातून वाद्य वाजवण्याचे कौशल्य ते आत्मसात करीत असत.

हेही वाचा >>> मुंबई : पंतप्रधानांच्या दौरा काळात ड्रोन, छोट्या विमानांच्या उड्डाणास बंदी

दुबईत आशा भोसले यांच्या शोसाठी वादक म्हणून ते हजर होते. शो संपल्यानंतर हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या एका लेबानिझ नर्तिका आणि वादकांच्या समूहाकडे त्यांनी दरबुका हे वाद्य पाहिले. रात्रभर ते त्यांच्या दरबुका वादनाचे निरीक्षण करत होते. बोंगो, कोंगो, तुंबा, दरबुका, डी-जेंबे अशा सर्वच पाश्चिमात्य वाद्यांवर त्यांची हुकुमत होती. प्रभाकर माशेलकर, मारुतराव कीर अशा संगीत संयोजकांकडूनही विविध वाद्य वादनाचे धडे घेतल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. पंधरा हजाराहून जास्त गाण्यात त्यांचा सहभाग आहे. हिंदीबरोबरच बंगाली आणि मराठी गण्यांसाठीही त्यांनी संगीतकार आणि वादक अशा दोन्ही भूमिकेतून काम केले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल नाईट’मध्येही त्यांचा सहभाग होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instrumentalist and composer nirmal mukherjee passes away at hiranandani hospital mumbai print news zws