मुंबई : दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेदरम्यान पावसाळ्यात उद्धभवणाऱ्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ (एमएमएमओसीएल) सज्ज झाले आहे. पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी आणि प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी एमएमएमओसीएलने पावसाळी नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२४ तास कार्यरत असणारा हा कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्र, पोलीस नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका सेवा आणि अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सर्व यंत्रणांशी समन्वय साधून समस्येचे तात्काळ निरसन करता येईल.

हेही वाचा – मुंबई : पावसाळ्यात नेरळ-अमन लॉज ‘मिनी टॉय ट्रेन’ सेवा खंडित

पावसाळ्यात मेट्रो २ अ आणि ७ च्या सेवेत कुठेही खंड पडू नये यासाठी एमएमएमओसीएलकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या प्रत्येकी ५ अशा एकूण १० स्थानकांवर वाऱ्याची गती आणि दिशा यांची नोंद करणारे ॲनिमोमीटर यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या यंत्राच्या साहाय्याने वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेता येत आहे. ज्यामुळे मुंबई मेट्रोला वाऱ्याच्या स्थितीचे बारकाईने निरीक्षण करून मेट्रोची सेवा विनाव्यत्यय कार्यान्वित ठेवणे सुरक्षित आहे की नाही हे ठरवता येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक मेट्रो स्थानकांवर किमान ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. फलाट, रस्त्यालगत असलेला भाग अशा ठिकाणी बसविण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांवर २४ तास नियंत्रण केंद्र आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

हेही वाचा – कोल्हापूरमधील दगडफेकीमागे कोण? ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले, “याचे सूत्रधार…”

प्रवाशांना आपत्कालीन स्थितीत वा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास १८००८८९०५०५, १८००८८९०८०७० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून तसेच पावसाळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या माध्यमातून पावसाळ्यात अखंडित आणि सुरक्षित मेट्रो सेवा प्रदान करण्यास एमएमएमओसीएल सज्ज असल्याची माहिती एमएमएमओसीएलचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon control room of mahamumbai metro operational mumbai print news ssb