चार दिवसांत केवळ चार हजार प्रवाशांकडून ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून काळी-पिवळीने प्रवास

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओला-उबरमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मुंबईकरांच्या सेवेत नुकत्याच दाखल झालेल्या काळी-पिवळी टॅक्सीचालकांच्या ‘आमची ड्राईव्ह’ या अ‍ॅपला अद्याप मुंबईकरांनी म्हणावा तितका प्रतिसाद दिलेला नाही.

गेल्या चार दिवसांत २० हजार मुंबईकरांनी ‘आमची ड्राईव्ह’ अ‍ॅप डाउनलोड केला आहे. मात्र चार दिवसांत फक्त चार हजार प्रवाशांनी काळी-पिवळी टॅक्सी भाडय़ाने घेऊन प्रवास केला आहे. या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून टॅक्सीचे बुकिंग करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

ओला-उबरला टक्कर देण्यासाठी काळी-पिवळी टॅक्सीचालकांच्या संघटनेने ‘आमची ड्राईव्ह’ अप्लिकेशन आणले. मुंबईकरांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या अ‍ॅप्सला मुंबईकरांकडून अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या चार दिवसांत २० हजार मुंबईकर प्रवाशांनी हे अप्लिकेशन डाउनलोड केले. या अ‍ॅप्लिकेशनला प्रवाशांनी ३.८ इतके रेटिंग दिले आहे. गेली कित्येक दशके मुंबईकरांना सेवा पुरवणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सीची ‘स्मार्ट टॅक्सी’ म्हणून ओळख निर्माण करण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.

बंगळुरूस्थित ‘सन टेलीमॅटिक्स’ या कंपनीने तयार केलेले हे ‘अ‍ॅप’ मुंबईकर प्रवाशांप्रमाणे काळी-पिवळी टॅक्सीचालकांच्याही पसंतीस उतरले असल्याचा दावा ‘टॅक्सी मेन्स युनियन’ने केला आहे. दररोज ५० ते ६० टॅक्सीचालक अ‍ॅप्सची नोंदणी करण्यासाठी पुढे येत आहेत. अ‍ॅपद्वारे सर्वात जास्त टॅक्सीचे बुकिंग दक्षिण मुंबईत होत आहे. येत्या काही दिवसात आम्ही १० हजार काळी-पिवळी टॅक्सींची अ‍ॅपमध्ये नोंदणी करणार असल्याचे टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष एल. के. क्वाड्रोस यांनी सांगितले.

दक्षिण मुंबईतून सर्वाधिक बुकिंग

१ जुलै रोजी टेलिकॉम कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना अ‍ॅपद्वारे संदेश पाठवता आला नाही. त्यामुळे रेटिंग कमी झाले. इतर टॅक्सी कंपनीच्या तुलनेत ‘आमची ड्राइव्ह’ला ३.८ रेटिंग मुंबईकरांनी देऊन या अ‍ॅपला पसंती दर्शवली आहे, असे ‘सन टेलीमॅटिक्स’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. विलास यांनी सांगितले. दादर, सीएसटी, मुंबई सेंट्रल आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणात टॅक्सीचे बुकिंग होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai taxi unions launch aamchi mumbai app