गेले अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून सर्व कामे होत आली आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील आणि देशातील परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच शहराचा विकास शक्य असल्याची धारणा नवी मुंबईतील नागरिकांची आणि आपल्या कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळेच आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या संदीप नाईक यांनी दिली. तसेच त्यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण आपल्या इच्छेुनुसार आणि जनतेच्या मागणीनुसारच निर्णय घेतला आहे. पक्षप्रवेशासाठी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण नाईक यांनी यावेळी दिले. नवी मुंबईचे प्रलंबित प्रश्न योग्य मार्गाने सुटावे अशी आमची इच्छा आहे. जसा विकास इतर शहरांमध्ये होत आहे, तसाच विकास नवी मुंबईचाही व्हावा आणि शहराचे नावलौकिक वाढावे, या उद्देशाने भाजपात प्रवेश केल्याचे ते म्हणाले.

2014 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये राज्यात आणि देशात वेगळीच लाट होती. तेव्हाही आम्ही निवडणूक लढलो आणि यशस्वी झालो. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे 52 आणि आमच्यासोबत असलेले 5 नगरसेवक निवडून आले आणि आम्ही सत्ता स्थापन करू शकलो. परंतु शहराचा विकास आणि प्रलंबित विषय मार्गी लागणं गरजेचे आहे, त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे संदीप नाईक म्हणाले. आपल्या कुटुंबीयांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आपल्याला दिले आहेत असे सांगत आपले कुटुंबीय त्यांच्याबाबत काय निर्णय घेतील हे बोलणे उचित होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sandeep naik resigns soon to join bjp jud