मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिच्यावर आधारित ओटीटी व्यासपीठावरून प्रदर्शित होणाऱ्या माहितीपटाचे प्रदर्शन २९ फेब्रुवारीपर्यंत केले जाणार नाही, अशी हमी नेटफ्लिक्सतर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. तुम्ही अशी हमी देणार की आम्ही त्याबाबतचे आदेश देऊ, असे न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केल्यानंतर नेटफ्लिक्सतर्फे उपरोक्त हमी देण्यात आली. प्रकरणाच्या तपासाशी संबंधित सीबीआयच्या अधिकाऱ्यांना हा माहितीपट दाखवण्यासाठी विशेष आयोजन करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी नेटफ्लिक्सला दिले. ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : द बरिड ट्रुथ’ या माहितीपटाला स्थगिती देण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची दखल घेऊन माहितीपटाचा भाग असलेल्या खटल्यातील उर्वरित साक्षीदारांची माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने नेटफ्लिक्सला दिले होते.

हेही वाचा : इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाच्या प्रदर्शनाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात, उर्वरित साक्षीदारांची माहिती देण्याचे नेटफ्लिक्सला आदेश

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix said in high court that indrani mukerjea series will not be screened till 29 th february mumbai print news css
First published on: 22-02-2024 at 14:42 IST