“राज्यात दर दिवशी कुठे ना कुठे जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे दलित तरुणांना झाडाला उलटे टांगून मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. असं असतानाच साताऱ्यातील माण येथे एका दलित महिलेला रस्त्यात फरफटत नेऊन लाथा बुक्क्यांनी, काठी आणि उसाने अमानुष मारहाण झाल्याची अत्यंत क्रूर घटना उघडकीस आली. याप्रकरणी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत सोडणार नाही,” असं मत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “साताऱ्यात एका दलित विधवेला ४ पुरुषांनी क्रूरपणे मारहाण केली. तिचा गुन्हा काय? तर तीने वैरणीसाठी म्हणजे गुरांच्या चाऱ्यासाठी पैसे दिले होते. पण चारा न मिळाल्याने तिचे स्वतःचे पैसे ती परत मागत होती म्हणून तिला क्रुरपणे मारहाण झाली. तिला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ इतका विचलित करणारा आहे की, या जातीय अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी मला शब्दही सापडत नाहीत. अगदीच क्रूर आणि अमानुष.”

“मागण्या मान्य करून घेण्यासाठी तीव्र आंदोलन करणार”

या पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटून आधार देणारा आणि मदतीला धाऊन जाणारा वंचित बहुजन आघाडी हा पहिला पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले. “आम्ही प्रभावीपणे हा मुद्दा मांडल्यामुळे या प्रकरणात ॲट्रोसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करावा लागला आणि त्या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. आमच्या स्थानिक नेतृत्वाने तहसीलदारांना आमच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. आजही हा न्यायचा लढा चालू ठेवत या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत,” असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

हेही वाचा : “आम्हाला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही, आता काँग्रेसला…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस हे वाचत असतील अशी मी आशा करतो. कारण जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही सोडणार नाहीत,” असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar warn state government over caste base atrocities pbs