दुसऱ्या नातवाचे फेरविचाराचे आवाहन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार यांच्या पुत्रासाठी माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले असतानाच राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले दुसरे नातू रोहित पवार यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन आजोबांना केले आहे. एका नातवासाठी पवारांना माघार घ्यावी लागली असतानाच दुसऱ्या नातवाने विरोधात भूमिका घेतल्याने पवार कुटुंबातच सारे काही आलबेल नाही हाच संदेश गेला आहे.

एकाच घरातील किती जणांनी निवडणूक लढवायची, असा सवाल करीत नव्या पिढीला संधी देण्याकरिता निवडणूक लढविणार नाही, असे शरद पवार यांनी सोमवारी जाहीर केले. २०१४ मध्ये थेट लोकांमधून निवडणूक लढणार नाही, असे पवारांनी जाहीर केले होते. पण गेल्या महिन्यात पवारांनी निर्णय बदलला आणि माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. मावळ मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हेसुद्धा प्रयत्नशील होते. पवार माढय़ातून तर सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची योजना होती. पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली असती तर एका घरात तीन जणांना उमेदवारी दिल्याची टीका झाली असती. यामुळेच पवारांनी माघार घेतली.

पवारांच्या बंधूचे पुत्र रोहित पवार यांनी समाज माध्यमावरून या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन केले आहे. राजकारणातील मोठे लोक पवारांच्या राजकारणाचा गौरव करीत असताना काय म्हणतात हे आपणाला माहीतच आहे. पण सर्वसामान्य लोक काय म्हणतात याकडे पवारांचे लक्ष असते. एक कार्यकर्ता म्हणून पवारांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे. या आदराच्या पुढे प्रेम असते. यातूनच निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे कार्यकर्त्यांचे मत आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.  पवार कुटुंबातील पार्थ आणि रोहित या तिसऱ्या पिढीतील दोघांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे.

‘पवारसाहेब आमचे नेते, त्यांना सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही’

शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा फेरविचार करावा, अशी विनंती त्यांचे नातू रोहित पवार यांनी केली असताना, पवारसाहेब आमचे नेते आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर भाष्य करण्याचा-त्यांना काही सांगण्याचा माझा अधिकार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे.  या पार्श्वभूमीवर आपण शरद पवार यांना विनंती करणार का असे अजित पवार यांना  विचारले असता, पवारसाहेब हे आमचे नेते आहेत. गेल्या ३० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कधीही त्यांच्या निर्णयावर भाष्य केलेले नाही. ते उत्तुंग नेते आहेत. त्यामुळे आता एकदा त्यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर पुन्हा त्यांना काही सांगण्याचा माझा अधिकार नाही, असे अजित पवार म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawars emotional appeal to sharad pawar decision