राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या व प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. तर, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर संपाच्या भडकत्या आगीत तेल टाकल्याचा आरोप केला आहे. तसेच कामगारांना फुस देणे, आंदोलन करणे ही नौटंकी भाजपाने बंद करावी. याला एसटी कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये आणि नुकसान करुन घेऊ नये”, असे आवाहन राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “शिवसेना कामगार वर्गातून जन्माला आली आहे, कष्टकरी मजूरवर्ग हा शिवसेनेचा पाठीराखा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कष्टकऱ्यांच नेतृत्व शिवसेना करत आहे. त्यामुळे आमची भूमिका चुकीची आहे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. आज ज्या मागण्या एसटी कर्मचारी करत आहेत त्याच मागण्या घेऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एसटी कामगार संघटनेचे लोक गेले होते, तेव्हा त्यांना हकलण्यात आलं, हे मी एका व्हिडीओत बघितल आहे.”

आज गोपीनाथ मुंडे असते तर…

“भाजपा पक्ष सध्या बाहेरच्या लोकांनी हायजॅक केलेला आहे. ज्यांचा पक्षाच्या विचारांशी काही सबंध नाही, अशा लोकांना हा पक्ष हायजॅक केला आहे. आज गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी एसटी कामगारांशी चर्चा करुन, सरकारशी चर्चा करुन एक मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी भडकलेल्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला नसता. आधीचे जे भाजपाचे नेते होते त्यांनी अशाप्रकारचं राजकारण केल नसत. आजही भाजपातले जे मूळ, शुद्ध लोक आहेत त्यांच्याशी माझ बोलन होतं, त्यांनाही वाटत की हा प्रश्न एकत्र येऊन सोडवायला हवा”, असे संजय राऊत म्हणाले. 

“ एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका ”

राजकीय पोळ्या भाजू नका

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. याचबरोबर, संपकरी आंदोलकांना प्रोत्साहन देणाऱ्यांना व विरोधकांवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. “कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका”, असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.

तर, संपकरी आंदोलकांना आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्यशासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले, असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.”

याचबरोबर “राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या.” असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction to the strike of st workers remember gopinath munde srk