नोंदणी व मुद्रांक विभागाने घरांची ई-नोंदणीला सुरुवात केली आहे. याला विकासकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत चार हजार घरांची ई-नोंदणी झाली आहे. यापैकी एक हजार घरे एकट्या म्हाडाच्या गृहप्रकल्पातील आहेत. महारेरा नोंदणीकृत पहिल्या विक्रीतील १०० टक्के घरांची ई-नोंदणी पद्धतीने नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यासाठी विकासकांनी मोठ्या संख्येने पुढे यावे, असे आवाहन महानिरीक्षक आणि नियंत्रक (मुद्रांक शुल्क) श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत केले. घरांच्या करारनाम्यांच्या नोंदणीसाठी घर खरेदीदारांना निबंधकाच्या कार्यालयात जाण्याची गरज भासू नये यादृष्टीने राज्य सरकारने ऑनलाइन नोंदणीचा पर्याय स्वीकारला आहे. महारेराकडे नोंदणी असलेल्या गृहप्रकल्पातील विक्री झालेल्या घरांची नोंदणी ऑनलाइन पध्दतीने करण्यात येणार आहे. राज्यात १ ऑक्टोबरपासून घरांची ऑनलाइन नोंदणी सुरू होईल, अशी घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’ च्या ‘रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह’मध्ये केली होती. या घोषणेनुसार १ ऑक्टोबर २०२१ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

हेही वाचा : “आदित्य ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांना कायद्याप्रमाणे उत्तर देऊ”, अनिल परबांचा सोमय्यांवर पलटवार, म्हणाले, “किरीट सोमय्या फक्त…”

नोंदणी व मुद्रांक विभागाने यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली तयार केली आहे. आतापर्यंत या प्रणालीद्वारे चार हजार घरांची ई-नोंदणी झाली असून यापैकी एक हजार घरे ही म्हाडाची असल्याची माहिती हर्डीकर यांनी दिली. तसेच आतापर्यंत ई-नोंदणीसाठी ४१७ खासगी विकासकांनी अर्ज केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील घरांची ई-नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ऑक्टोबरमध्ये बीकेसी येथे होणाऱ्या क्रेडाय-एमसीएचआयच्या मालमत्ताविषयक चार दिवसीय प्रदर्शनात ई-नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharavan hardikar said developers should come forward for e registration in mhada housing projects in mumbai print news tmb 01