आमिषाला बळी पडू नका!; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे माजी नगरसेवकांना आवाहन

पालिकेची निवडणूक जवळ येत असून प्रत्येकाने आपापल्या विभागात काम करत राहा.

आमिषाला बळी पडू नका!; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे माजी नगरसेवकांना आवाहन
उद्धव ठाकरे (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

मुंबई : पालिकेची निवडणूक जवळ येत असून प्रत्येकाने आपापल्या विभागात काम करत राहा. तुम्ही माजी नगरसेवक असलात तरी काम करत राहा, कामे होत नसतील तर आयुक्त, उपायुक्तांची भेट घ्या, पाठपुरावा करा. सध्या विविध आजारांचे रुग्ण वाढत असून लोकांना मदत करण्याचे काम करा. आता तुम्ही नगरसेवक नसला तरी लोकांशी आपली नाळ जोडलेली आहे, लोकांचा आपल्यावर विश्वास आहे त्यामुळे लोकांसाठी काम करत राहा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत केले. सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेत निवडणूकांच्या तोंडावर कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.

मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकांची तातडीची बैठक शुक्रवारी शिवसेना भवन येथे बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, सुभाष देसाई, आमदार अ‍ॅड. अनिल परब, आमदार रवींद्र वायकर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना येत्या निवडणुकांच्या तोंडावर कशा पद्धतीने काम करायला हवे याबाबत  मार्गदर्शन केले. प्रत्येक माजी नगरसेवकांने आपापल्या विभागात काम करत राहावे, सामाजिक बांधिलकी जपत लोकांची कामे करा, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. निवडणुकीत अन्य पक्षांकडून उमेदवारांना आमिष दाखवले जाऊ शकते, यााबबतही त्यांनी नगरसेवकांना सावध केले. तुम्हालाही फोन येतील पण तुम्ही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी नगरसेवकांना केले.

१३ नगरसेवक अनुपस्थित

शिवसेनेचे गेल्या पालिकेत ९७ नगरसेवक होते. त्यापैकी या बैठकीला शिवसेनेचे १३ ते १५ नगरसेवक अनुपस्थित होते.  मात्र अनेक नगरसेवक बाहेरगावी होते तर काहींच्या काही घरगुती अडचणी होत्या त्यामुळे हे नगरसेवक येऊ शकले नाहीत, अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. बैठकीबाबत गुरुवारी रात्री सर्वाना निरोप गेले होते, मात्र काही जण गावी गेले होते तर काही जण देवदर्शनाला गेले आहेत. त्यांनी रितसर तसे कळवले असल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले.

कोण गैरहजर?

या बैठकीला थेट बंडखोरांबरोबर असलेले पाच माजी नगरसेवक गैरहजर होते. त्यात दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, प्रभादेवीतील नगरसेवक समाधान सरवणकर, कुर्ला येथील बंडखोर आमदार व नगरसेवक दिलीप लांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, तसेच बंडखोर खासदार राहूल शेवाळे यांच्या वहिनी माजी नगरसेविका वैशाली शेवाळे अनुपस्थित होत्या, तर अन्य अनुपस्थितांमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर, विशाखा राऊत हे देखील अनुपस्थित होते. मात्र ते त्यांच्या घरगुती कारणांमुळे अनुपस्थित होते असे समजते. तर माजी नगरसेवक अमेय घोले या बैठकीलाही अनुपस्थित होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शिंदे गटाचे दादरमध्येच मुख्यालय; मुंबईतील सर्व प्रभागांत, राज्यातील सर्व जिल्ह्यांत कार्यालये
फोटो गॅलरी