राज्यातील शेतकऱयांच्या आत्महत्यांवरून सरकारला ‘घरचा आहेर’ देणारे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यासह भाजप सरकारवर शिवसेनेने कोरडे ओढले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा कमी पडत आहेत, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी अकार्यक्षम आहेत, अशी कबुली देतानाच मुंबईतील वातानुकूलित कार्यालयात बसून मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या दु:खाच्या झळा कशा काय कळणार? अशा शब्दांत राज्याच्या महाधिवक्त्यानेच जर सरकारवर टीका केली तर राज्यात इतर दुश्मनांची गरज ती काय? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकरी आत्महत्येवरून श्रीहरी अणेंचा सरकारलाच घरचा आहेर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेले राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणे आपल्याच सरकारची आणखी किती अब्रू काढणार आहेत? सरकारच्या प्रमुख वकिलांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडायची असते, पण फडणवीस यांनी नेमलेले वकील उटलेच वागताना दिसत आहेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, मराठवाड्यातील शेतकऱयांना घोटभर पाणी आणि पराभर धान्य हवे आहे. गुरांना चारा हवा आहे. हे सर्व देण्यात राज्यावर राज्य करणारे विदर्भाचे नेते अपयशी ठरले आहेत, असे आमचे मत नसून मुख्य वकिल श्रीहरी अणे यांचेच असल्याचे सांगत शिवसेनेने फडणवीस सरकारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

विदर्भाच्या बाबतीतही अणे यांनी वादग्रस्त विधान केले होते. तेव्हा त्यांचे मत वैयक्तिक मत असल्याचे सांगून अणे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला गेला, पण अणे यांनी सरकारच्या विरोधात केलेले विधान वैयक्तिक म्हणता येणार नाही. दुसऱया एखाद्या राज्याच्याय मुख्य वकिलांनी असे वक्तव्य केले असते तर दुसऱया मिनिटात बडतर्फ केले गेले असते. पण श्रीहरी अणे रोज सरकारची बदनामी करत असूनही पदावर कायम का? असा सवाल जनतेच्या मनात उपस्थित होत असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena criticises shreehari aney and bjp government