भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पनवेल महापालिका निवडणुकीचे Panvel Municipal Election निमित्त साधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना लक्ष्य केले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना प्रचार करण्यास बंदी घातली पाहिजे, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आपल्या पदाचा वापर करत मोठमोठी आश्वासने देऊन ते मतदारांवर प्रभाव टाकतात. पण निवडणुकीनंतर त्यांच्याकडून एकही आश्वासन पूर्ण केले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल येथील प्रचारसभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निवडणूक प्रचारसभेत अनेक घोषणा करतात, आश्वासने देतात. इतर पक्षांच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनापेक्षा सत्ताधारी प्रमुखाने दिलेल्या आश्वासनांचा मतदारांवर मोठा प्रभाव पडतो. पण जेव्हा ते सत्तेवर येतात. तेव्हा त्यांना आपल्या आश्वासनांचा विसर पडतो, असा आरोपही केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणुकीच्या प्रचारात कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान मोदींनीही बिहार निवडणुकीवेळी १.२५ कोटींचे पॅकेज जाहीर केले. पण निवडणुकीनंतर त्यांनी एकही पैसा दिलेला नाही, असे ते म्हणाले.

पाकिस्तानबरोबरील संबंधाबाबत बोलताना ते म्हणाले, भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतरही त्यांच्याकडून वारंवार भारतावर हल्ले होतच आहेत. आता आणखी एका भारतीयाला पाकिस्तानने अटक केल्याचे वृत्त आले आहे. पुन्हा त्याच्यावर चुकीचे गुन्हे नोंदवून त्यालाही फासावर चढवले जाईल, असे म्हणत पाकिस्तान तुम्हाला का घाबरत नाही, असा सवाल उपस्थित केला.

पंतप्रधानांनी पक्ष कसा मजबूत होईल या पेक्षा देश कसा मजबूत होईल याचा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही अशाच पद्धतीने वागले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. प्रत्येक ठिकाणी, चौकाचौकात जाऊन प्रचारसभा घेण्यापेक्षा शेतकऱ्यांची परिस्थिती कशी सुधारली पाहिजे, राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

या वेळी त्यांनी इव्हीएमवरही भाष्य केले. इकडे निवडणूक आयोग राजकीय पक्षांना इव्हीएम हॅक करण्याचे आव्हान देते. जर राजकीय पक्षांना इव्हीएम हॅक करता आले तर ते निवडणुकीचा प्रचार करणार नाहीत. हे म्हणजे चोरीची तक्रार करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी चोरी कशी झाली हे त्याला सिद्ध करून दाखवून दे म्हटल्यासारखं असल्याचे त्यांनी उपरोधिकपणे म्हटले. इव्हीएममध्ये फेरफार होते की नाही याची खात्री करण्याचे काम तुमचे (निवडणूक आयोग) आहे, असे ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena party chief uddhav thackeray criticized pm narendra modi cm devendra fadnavis panvel municipal election