मुंबईः राज्यात एकत्र सत्तेत असणारा शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर वादविवाद होत आहेत. दहिसर येथे फलक लावण्यावरून भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी पहाटे वाद झाला. त्यात भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली असून याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे वरळीतून लढणार? मनसेची मोर्चेबांधणी
दहिसर येथील अशोकवन येथे शिंदे गटाचे नवनाथ नावाडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे फलक काढून त्या जागी गुढी पाडव्याचे फलक लावण्यात आले. त्यावरून झालेल्या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या बिभिषण वारे यांना मारहाण केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. वारे यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. दरम्यान शिंदे गटातील स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक वन परिसरात मलनिसारण वाहिनीच्या भूमिपूजनाचे शिंदे गटाने लावलेले फलक हटवून त्या जागी नावाडकर यांच्या भाजप प्रवेशाचे फलक वारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावून चिथावणी दिल्यामुळे हा वाद झाल्याचे समजले. त्यानंतर दहिसर पूर्व येथील हनुमान टेकडी परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वारे यांना मारहाण केली. त्यात वारे यांच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत झाल्याचे शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी वारे यांचा जबाब नोंदवण्यात असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.