शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, खुद्द संजय राऊत यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. “आमची अशी कोणतीही भेट झालेली नाही आणि जरी भेट झाली असली, तरी त्यात गैर काय? महाराष्ट्राचं किंवा देशाचं राजकारण हिंदुस्थान-पाकिस्तानसारखं नाहीये. पण ज्यांना माझ्यामुळे त्रास होतो, माझ्या लिहिण्या-बोलण्यामुळे त्रास होतो, अशा लोकांकडून अशा अफवा पसरवल्या जातात, मी त्यांचं स्वागतच करतो”, असा खोचक टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. तसेच, उद्यापासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातील सरकारच्या धोरणाविषयी देखील त्यांनी मत मांडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील”

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी अशी भेट झाली जरी असेल, तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? असा सवाल केला. “महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटले, तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण काय? पण मुळात अशा पद्धतीची भेट झालेलीच नाही. मी कामात होतो. पण तरी अफवा पसरवण्यात आल्या. पण अशा अफवांमुळे राजकारण हलतं का? अस्थिर होतं का? अजिबात नाही. महाराष्ट्राच्या सरकारला काही अडचणी निर्माण होतील का? अजिबात नाही. उलट अशा अफवा पसरवल्यामुळे आमचे तीन पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. त्यामुळे अशा अफवा पसरवण्याचे हे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील”, असं राऊत म्हणाले.

“हे राजकारण हिंदुस्थान-पाकिस्तानसारखं नाही”

“माझी कुणाशीही भेट झालेली नाही. खूप आधी आशिष शेलार एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटले होते. तेव्हा आम्ही कॉफी देखील प्यायलो होतो. महाराष्ट्रातलं राजकारण हिंदुस्तान-पाकिस्तानसारखं नाही की गोळ्या घाला आणि संपवा. या प्रकारे अफवा पसरवल्यामुळे काहीही होणार नाही. उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होतंय. त्याआधी अफवा पसरवल्या जात आहेत. ज्यांना माझ्यामुळे त्रास होतो, माझ्या बोलण्यामुळे, माझ्या लिहिण्यामुळे, ते माझ्याबद्दल अशा अफवा पसरवतात. मी अशा अफवांचं स्वागत करतो”, असा टोला राऊत यांनी लगावला.

अयोध्येतील राम जन्मभूमी जमीन घोटाळा हा श्रीमंतांचा अपराध; राऊतांचा केंद्रावर निशाणा

जर विरोधकांना महाराष्ट्राची चिंता असेल….

“सरकारचे अनेक महत्त्वाचे मुद्दे असू शकतात. राज्याच्या हिताचे अनेक विषय आहेत. यावर चर्चा होणं गरजेचं आहे, काही निर्णय होणं गरजेचं आहे, काही कायदे मंजूर होणं गरजेचं आहे. पण विरोधी पक्षांनी दोन दिवस विधिमंडळाचं कामकाज चालू दिलं पाहिजे. जर विरोधी पक्षांना महाराष्ट्राची चिंता असेल, ते स्वत:ला महाराष्ट्राचे समजत असतील, तर दोन दिवस पूर्णवेळ अधिवेशन विरोधी पक्ष चालू देईल”, असं ते म्हणाले. “गोंधळ म्हणजे रणनीती नाही. अधिवेशन चालू न देणं याला रणनीती म्हणत नाही. दोन दिवसांचे अधिवेशन जेव्हा होतात, तेव्हा ते गोंधळात वाहू देऊ नये अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे”, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp sanjay raut on rumors about his meeting with bjp mla ashish shelar pmw