समीर कर्णुक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेंबूरच्या खारदेव नगर परिसरातील वैभव नगर येथे एका सार्वजनिक शौचालयाच्या जागी समाजकल्याण केंद्र उभारण्याची स्थानिक आमदाराची योजना वादात सापडली आहे. अनेक वर्षांपासून येथे असलेले शौचालय आता गरज नसल्याचे सांगत पाडण्यात आले आहे; परंतु या ठिकाणी शौचालय असलेच पाहिजे, असा आग्रह रहिवाशांनी धरला आहे.

खारदेव नगर परिसरातील वैभव नगर आणि आनंद नगर येथील रहिवाशांसाठी ३० ते ३५ वर्षांपूर्वी पालिकेने सार्वजनिक शौचालय बांधले होते. पूर्वी या परिसरात खूप झोपडय़ा असल्याने रहिवाशी त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर करत होते. मात्र चार-पाच वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत इमारती उभ्या राहिल्याने या शौचालयांचा पूर्वीपेक्षा वापर कमी झाला असला तरी त्याची गरज संपली नाही. दरम्यान, पालिकेकडूनही या शौचालयाची योग्य डागडुजी झाली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या शौचालयाची मोठी दुरवस्था झाली होती. अचानक काही दिवसांपूर्वी पालिकेकडून ते पाडण्यात आले. आता या ठिकाणी शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या आमदार निधीतून समाज कल्याण मंदिर बांधण्यात येत आहे.

ज्यांच्या झोपडय़ांचा विकास झालेला नाही ते रहिवाशी अद्यापही या शौचालयावर अवलंबून आहेत. शिवाय जवळच असलेल्या पालिका व खासगी शाळेतील विद्यार्थी व त्यांना सोडायला येणारे पालक त्याचा वापर करतात, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

आम्हाला विश्वासात न घेताच हे शौचालय तोडल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला. याबाबत पालिकेच्या एम पश्चिम विभागाशी संपर्क साधला असता, म्हाडाकडून आमच्याकडे या ठिकाणी समाज मंदिर बांधण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यानुसार आमच्याकडून त्यांना ‘ना हरकत’ देण्यात आल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

पुरेसा वापर होत नसल्याने अनेक वर्षांपासून शौचालयाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या ठिकाणी समाजकल्याण केंद्र बांधत आहोत. त्याचा उपयोगही स्थानिकांनाच होणार आहे. काही व्यक्ती त्याचे विनाकारण राजकारण करत आहेत.

– प्रकाश फातर्पेकर, आमदार

रहिवाशांबरोबरच विद्यार्थी, पालक या शौचालयाचा वापर करीत होते. शौचालयाच्या डागडुजीसाठी अनेक वर्षांपासून मी पालिकेशी पत्रव्यवहार करत आहे. तरीही या ठिकाणी काम सुरू करण्यात आले आहे.

–  विक्रम म्हात्रे, स्थानिक रहिवासी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social welfare center in toilets