सार्वजनिक रुग्णालयातील पहिलाच प्रयोग यशस्वी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शीव रुग्णालयातील बालरोग विभागाच्या डॉक्टरांसाठी चौदा वर्षांच्या शिवकुमारवर बोनमॅरो ट्रान्सप्लांट करणे हे एक आव्हान होते. देशातील सार्वजनिक रुग्णालयातील हे पहिलेच प्रत्यारोपण.. त्यामुळे आव्हान मोठे होते. विभागप्रमुख डॉ. ममता मंगलानी यांनी ते स्वीकारले एवढेच नव्हे तर, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने यशस्वी करून दाखवले.
दहा लाखांमध्ये दोन जणांना होणारा हा आजार तसा दुर्मीळ. शिवकुमारला अप्लास्टिक अ‍ॅनिमियामुळे त्याचे बोनमॅरो कार्य बंद झाले. परिणामी त्याला बाहेरून रक्त तसेच प्लेटलेट द्यावे लागे (ट्रान्सफ्युजन करणे). यात संसर्ग होण्याची तसेच मेंदूत रक्तस्राव होऊन मृत्यू होण्याचा धोका असतो. परिणामी अशा रुग्णांवर बोनमॅरो ट्रान्सफ्लांट म्हणजे ‘हिमेटोपोएटिक स्टेम सेल ट्रान्सफ्लांट’ प्रत्यारोपण करणे हा एक पर्याय असतो. बोनमॅरोसाठी रक्ताच्या नात्यातील व्यक्ती म्हणजे सख्खा भाऊ-बहीण असणे उत्तम असते. अगदी मोजक्याच प्रकरणात रक्ताच्या सख्ख्या नात्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीचे स्टेमसेल जुळतात. परिणामी घरातील भाऊ अथवा बहिणीने स्टेमसेल दिल्यास ही प्रक्रिया यशस्वी होऊ शकते. शिवकुमारच्या नऊ वर्षांच्या धाकटय़ा भावाने आपले रक्त (स्टेमसेल) देण्याची तयारी दाखवली. अर्थात ही तयारी दाखवली तरी ट्रान्सप्लांटसाठी अनेक चाचण्यांच्या जंजाळातून जावे लागते. चाचण्या तसेच औषधांसाठी येणारा खर्च प्रचंड असतो. महापालिका रुग्णालयात या एका प्रक्रियेसाठी सुमारे अकरा लाख रुपयांचा खर्च आला, तर खासगी रुग्णालयात याच ट्रान्सप्लांटसाठी किमान पंचवीस लाख रुपये खर्च येत असल्याचे डॉ. ममता मंगलानी यांनी सांगितले. यासाठी ‘चेरिश लाइफ इंडिया फाऊंडेशन ट्रस्ट’च्या सहकार्याने स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. यात रुग्णाला संपूर्ण वातानुकूलित खोलीत स्वतंत्रपणे ठेवले जाते. परिणामी त्याला कोणताही संसर्ग होण्याची शक्यता राहात नाही. बोनमॅरोसाठी दात्याच्या मज्जापेशी जुळणे आवश्यक असते. त्यासाठी ‘एचएलए’ ही विशिष्ट चाचणी करावी लागते. त्यानंतरच ट्रान्सप्लांट करणे शक्य होते. शिवकुमारचा धाकटा भाऊ बबलू याने ही तयारी दाखविल्यानंतर एका खास यंत्राद्वारे त्याच्या रक्तातील स्टेमसेल वेगळे काढून घेण्यात आले. यासाठी सुमारे सहा तास लागतात. माणसाच्या हाडातील उती या लाल रक्तपेशी तयार करण्याचे काम करतात. ‘अप्लास्टिक अ‍ॅनिमिया’मध्ये हे कार्य थांबल्यामुळे रुग्णाला बाहेरून रक्त तसेच प्लेटलेट द्याव्या लागतात. तथापि ‘हिमेटोपोएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट’मध्ये हाडांमध्ये नव्या मज्जापेशी सोडल्या जातात. या पेशी नव्या मज्जापेशींना जन्म देण्याची क्षमता ठेवणाऱ्या असून रक्तनिर्मितीला पूरक ठरत असल्यामुळे बाहेरून रक्त अथवा प्लेटलेटस् द्यावे लागत नाही तसेच रुग्ण संपूर्णपणे बरा होतो. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी शीव रुग्णालयात दाखल झालेल्या शिवकुमारवर २६ ऑगस्ट रोजी ट्रान्सप्लांट प्रक्रिया करण्यात आली असून येत्या दोनएक दिवसांत त्याला घरी पाठविण्यात येईल, असे डॉ. मंगलानी यांनी सांगितले. शिवकुमारवरील उपचाराचा सर्व खर्च ‘चेरिश लाइफ इंडिया फाऊंडेशन ट्रस्ट’ने उचलला तर डॉ. निरांजन राठोड (ट्रान्सप्लांट फिजिशयन), डॉ. श्वाता बन्सल, डॉ. रत्ना शर्मा आदींचा प्रमुख सहभाग या ट्रान्सप्लांटसाठी असल्याचे डॉ. मंगलानी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful bonnaroo transplant of 14 years old boy in shiv hospital