बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने तिची बँक खाती आणि एफडी डिफ्रीझ करण्याची आणि अंधेरीतील तिचे दोन फ्लॅट डी-सील करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका ठाण्याच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळली आहे. २०१६ मधील २ हजार कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणात तपासाचा एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी कारवाई करत तिची बँक खाली सील केली होती. या प्रकरणात ममतासह तिचा पती विकी गोस्वामीला आरोपी करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ममता कुलकर्णीने तिच्या वकिलांमार्फत न्यायलयात याचिका दाखल केली होती. यामध्ये तिच्या कुटुंबात ती एकमेव कमावणारी व्यक्ति असून मानसिक आजारी असलेल्या तिच्या बहिणीचा खर्च तिला करावा लागतो, त्यामुळे न्यायालयाने बँक खाती खुली करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र ममता कुलकर्णी आतापर्यंत तपास यंत्रणेसमोर तसेच सुनावणी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहिलेली नाही. त्यामुळे तिने बँक खाती खुली करण्यासाठी दिलेली कारणे पुरेशी वाटत नसल्याचे म्हणत न्यायाधिश राजेश गुप्ता यांनी तिची याचिका फेटाळली आहे.

काय आहे प्रकरण?

२०१६ मध्ये ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीनुसार, ठाण्यातून 2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या होत्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफिड्रिन ड्रग्ज सापडले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी होता. त्यानंतर ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडल्याने तिला आरोपी करण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane court rejects ex bollywood actor mamta kulkarni plea to de freeze her bank accounts in drug bust case hrc