मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात विकासनिधीच्या वाटपात पालिका प्रशासनाने भाजपला झुकते माप दिले आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांच्या विभागात प्रत्येकी ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर इतर प्रभागांसाठी हीच तरतूद प्रत्येकी एक कोटी ठेवण्यात आली आहे. इतर पक्षाच्या गटनेत्यांनी नागरी कामांसाठी पत्र न दिल्यामुळे कमी तरतूद केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प प्रशासक इकबालसिंह चहल यांनी नुकताच सादर केला. पालिका प्रशासनाने प्रचलित धोरणानुसार बृहन्मुंबईतील एकूण २२७ नगरसेवक व १० नामनिर्देशित नगरसेवकांकरिता प्रत्येकी ६० लाख रुपये याप्रमाणे एकूण १४२.२० कोटी रुपये एवढी तरतूद नगरसेवक निधीत करण्यात आली आहे. विविध नागरी सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या विकास निधीमध्ये मात्र प्रशासनाने भाजपला झुकते माप दिले आहे.

भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना पत्र देऊन या निधीची मागणी केली होती. या पत्रासोबत जोडलेल्या यादीत नमूद केलेल्या ७७ प्रभागांमध्ये रु.३ कोटी याप्रमाणे एकूण रु.२३१ कोटी एवढय़ा रकमेची तरतूद विविध पायाभूत, मूलभूत व नागरी सुविधा पुरविणे तसेच विकासकामे करण्याकरिता या शीर्षांतर्गत केली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. उर्वरित १५० प्रभागांकरिता कोणत्याही पक्षाच्या माजी गटनेत्यांकडून अशाप्रकारचे पत्र प्राप्त झालेले नव्हते असा युक्तिवाद प्रशासनाने केला आहे.

 तरी देखील प्रशासनाने स्वत:हून या प्रत्येक प्रभागामध्ये विविध पायाभूत, मूलभूत व नागरी सुविधा पुरविणे तसेच विकासकामे करण्याच्या उद्देशाने रु.१ कोटी याप्रमाणे रु.१५० कोटी एवढी आणि १० नामनिर्देशित नगरसेवकांकरिता एकूण रु.१४ कोटी एवढी तरतूद केली असल्याचे सांगून प्रशासनाने स्वत:ची पाठ थोपटली आहे. महानगरपालिकेने रु.६५० कोटी इतक्या रकमेची तरतूद विविध पायाभूत, मूलभूत व नागरी सुविधा पुरविणे तसेच विकासकामे करण्याकरिताच्या शीर्षांखाली केली आहे. मात्र त्यातील मोठा वाटा भाजपला मिळणार आहे. पालिकेचा अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रशासक स्थायी समिती यांच्या स्तरावर तसेच दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत प्रशासक महानगरपालिका यांच्या स्तरावर मंजूर करावा लागणार आहे.

तरतूद अशी..

भाजपच्या ७७ नगरसेवकांच्या आणि २ नामनिर्देशित नगरसेवकांच्या प्रभागातील विविध नागरी कामासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात प्रत्येकी ३ कोटी रुपये याप्रमाणे एकूण २३१ कोटी रुपये एवढय़ा रकमेची तरतूद करण्यात आली आहे. विविध पायाभूत, मूलभूत व नागरी सुविधा पुरविणे तसेच विकासकामे करण्याकरिता या शीर्षांतर्गत ही तरतूद केली आहे. तर उर्वरित १५० प्रभागांकरिता  प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे १५० कोटी रुपये एवढी आणि १० नामनिर्देशित नगरसेवकांकरिता एकूण १४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. या निधी वाटपात भाजपला जास्त निधी देण्यात आला असून शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष या अन्य पक्षांच्या मतदारसंघात कमी निधी देण्यात आला आहे.  तसेच शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातही कमी निधी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The administration claims group leaders other parties not given the letter bjp allocation of funds ysh