मुंबई : मुंबई ही आर्थिक, वाणिज्यिक आणि मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आणि तैवानमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘तैवान एक्स्पो २०२३ इंडिया’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी तैवान एक्स्टर्नल डेव्हलपमेंट कौन्सिल (ताईत्रा) चे अध्यक्ष जेम्स हुआंग, राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, तैपाई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर, मुंबईचे महासंचालक होमर च्यांग आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>“हा आहे माझ्या लंडन दौऱ्याचा खर्च, आता…”, उदय सामंत यांच्याकडून हिशोब मांडत विरोधकांना उत्तर
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस आहे. महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअपचेही प्रमुख केंद्र असून राज्यात १७ हजार नोंदणीकृत स्टार्टअप, तर देशातील १०० पैकी २५ युनिकॉर्न आहेत. परकीय थेट गुंतवणुकीतही राज्य आघाडीवर असून २०२८ पर्यंत राज्याचे एक लाख कोटी (ट्रिलियन) डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.