मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आत्ताही काही भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. मार्चमधल्या प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरीही अवकाळीने शेतकऱ्याची झोप उडवली आहे. तसंच कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचीही तारांबळ उडाली आहे. मार्च महिन्यात सकाळी सकाळी मुंबईकरांना छत्री घेऊन ऑफिस गाठावं लागतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई, ठाण्यासह कल्याणमध्येही पावसाच्या सरी

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. अंधेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. त्याचप्रमाणे जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहीसर या भागांतही पाऊस सुरू आहे. तसंच दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या उपनगरांमध्येही पाऊस पडतो आहे. काही वेळ पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पावसाच्या सरी येत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

कल्याण डोंबिवलीत दमदार सरी

कल्याण डोंबिवलीत मंगळवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून ठिबकणाऱ्या अवकाळी पावसाने साडे सहा वाजता विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली. सकाळीच कामावर निघालेल्या नोकरदार, वृत्तपत्र विक्रेते ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडवली.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पहाटेपासून आवारात उघड्यावर भाजीपाला ठेऊन विक्री व्यवहार करणारे विक्रेते, खरेदीदार, वाहन चालकांची अवकाळी पावसाने भंबेरी उडवली. उघड्यावर ठेवलेला भाजीपाला, फळे, फुले झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांना धावपळ करावी लागली. बाजारपेठांमध्ये सकाळचे व्यवहार होत असलेल्या ठिकाणी चहा, नाश्ता मंचकावर ठेऊन नियमित व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना इमारती, निवाऱ्याचा आडोसा घ्यावा लागला. वृत्तपत्र विक्रेत्यांना काही वेळ इमारतींचा आडोसा घेऊन वर्तमानपत्र भिजू नये म्हणून काळजी घ्यावी लागली.

मुंबई आणि ठाण्याप्रमाणेच पालघर आणि डहाणूमध्येही वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांचं आणि बागायची शेतीचं मोठं नुकसान होण्याची चिन्हं आहेत. शेतकरी आधी झालेल्या अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे अशात पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. बुलढाणा, परभणी, सातारा, धुळे, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

पनवेल आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस

पनवेल तालुक्यातील अनेक गावांसहीत तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी सकाळपासून जोरदार पावसाची सुरुवात झाली. यामुळे मंगळवारची सकाळ पनवेलकरांना गारवा अनुभवता आला. या पावसामुळे दिवसभरातील उनाचा उकाड्यातून काही प्रमाणात रहिवाशांना दिलासा मिळाला. सकाळी पावणे सात वाजल्यापासून पावसाची सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

नवी मुंबईतही जोरदार पाऊस

नेटकऱ्यांना झाली १९७० च्या पावसाची आठवण

मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे नेटकऱ्यांना १९७० च्या पावसाची आठवण झाली आहे. काही नेटकऱ्यांनी मुंबईतल्या १९७० च्या पावसाचे फोटोही ट्वीटरवर ट्वीट केले आहेत. तर काही जणांनी रात्रीपासून पडणाऱ्या पावसाचे व्हीडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain in mumbaithane and maharashtra read the news in deatil scj
First published on: 21-03-2023 at 08:06 IST