मुंबई : अंधेरी येथील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील पातळी वरखाली झाल्यामुळे पालिका प्रशासनाचे जे हसे झाले आहे त्यावरून पालिका प्रशासनाने आता बोध घेण्याचे ठरवले आहे. या प्रकरणी आता सत्यशोधन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याकरीता अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही प्रकल्पात नियोजनातील अभाव राहू नये म्हणून या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी सत्यशोधन करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुलाचे गर्डर आणण्यास उशीर करणाऱ्या कंत्राटदारालाही दंड करण्यात येणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.

गोखले पूलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाली असली तरी वाहनचालकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. अंधेरी पश्चिम दिशेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाली आहे, तसेच पुलामध्ये त्यात मोठे दोन मीटरचे अंतर निर्माण झाल्यामुळे बर्फीवाला पूल बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी गोखले पूलावरून जशी सुरळीत वाहतूक होत होती तशी ती आता होत नाही. या सगळ्यामुळे वाहनचालकांना प्रचंड वेळ लागतो आहे. तसेच यामुळे पालिकेच्या नियोजनाचे हसे झाले असून पालिकेवर समाजमाध्यमावरून टीकाही होत असते. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होऊ लागली होती. त्यानुसार पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे संकेतही दिले होते. मात्र या प्रकरणात नक्की नियोजन का फसले हे शोधण्यासाठी सत्यशोधन अहवाल तयार करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. त्याकरीता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत अवघा १७ टक्के साठा, पालिका प्रशासन घेणार मंगळवारी आढावा

रेल्वे प्रशासनाने रेल्वेवरील पुलांची उंची वाढवल्यामुळे हे अंतर निर्माण झाले असल्याचे पालिका प्रशासनाने आधीच स्पष्ट केले आहे. तसेच बर्फीवाला पूल हा एमएसआरडीसीने बांधलेला असल्यामुळे त्याबाबतची माहिती प्रशासनाकडे नाही, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन पूलांमध्ये अंतर पडले असल्याची बाब पालिका प्रशासनाला माहीत नव्हती असे नाही. मात्र आधी गोखले पूल सुरू करून मग बर्फीवाला पूलाबाबतचा निर्णय घेऊ अशी भूमिका त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी मिळून घेतली. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक फटका बसलेला नसून दूरदृष्टी किंवा निर्णय क्षमतेबाबत प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे यापुढे असे घडू नये म्हणून काय केले पाहिजे हे ठरवणे हा या सत्यशोधन अहवालाचा मुख्य उद्देश्य असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी एमएसआरडीसीने या पूलाची माहिती दिलेली नसल्यामुळे अनेक महिने वाया गेले त्यामुळेही हे नियोजन फसले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आयआयटी मुंबई आणि व्हिजेटीआय या संस्थांकडून सल्ला घेतला आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार हे दोन पूल जोडण्यासाठी जॅक लावून पूलाचा काही भाग वर खेचून पातळी समतल करण्याचे काम सुरू आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – वडिलांच्या प्रचारात व्यग्र असल्याने उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ द्या, नितेश राणेंची उच्च न्यायालयात मागणी

दरम्यान, गोखले पुलाच्या दुसऱ्या तुळईचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला असून त्यामुळे पुलाची दुसरी बाजू तयार करण्याचे वेळापत्रकी कोलमडणार आहे. तुळई उभारण्याची मे महिनाअखेरची मुदत पुढे ढकलावी लागणार आहे. तुळई येण्यास उशीर झाल्याची बाब मुंबई महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून या प्रकरणी कंत्राटदाराला दंड करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.