गोंदिया : काँग्रेस जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर पक्ष शिस्त मोडल्याच्या कारणावरून वरिष्ठांनी कारवाई करावी, यासाठी ‘काँग्रेस वाचवा’ समितीने गोंदियातील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात १ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी भेट दिली व पुढील दहा दिवसात यावर ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आंदोलनाचे वृत्त प्रदेश काँग्रेस कमिटीला कळताच पक्षातील वरिष्ठ काँग्रेस अधिकाऱ्यांनी गोंदियातील आंदोलनस्थळी पोहोचून उपोषणकर्त्यांची भेट घेतली व लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. वरिष्ठांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आज, मंगळवारी आंदोलन मागे घेतले आहे. गोंदिया जिल्हा काँग्रेस पक्षात सध्या गटबाजी उघडपणे समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. गोंदिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांच्याकडून बाजार समितीच्या निवडणूकीत भाजप सोबत युती करणाऱ्या व पक्षातील वरिष्ठांच्या आदेशाला न मानणाऱ्या,गटबाजी करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या ‘काँग्रेस वाचवा’ समितीने केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निष्ठावंत काँग्रेसजनांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> ‘मान्सून’चा मुहूर्त हुकला! आगमनाबाबत साशंकता; प्रवेश लांबणीवर!

गटबाजीमुळे काँग्रेसचे नुकसान होत आहे.  यासाठी जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड व जिल्हा उपाध्यक्ष गप्पू गुप्ता यांनी पक्षाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत जिल्हा काँग्रेस कार्यालयात बेमुदत उपोषणाची मालिका सुरू करण्यात आली होती. काँग्रेस वाचवा  समितीच्या पदाधिकाऱ्यांनी १ जून पासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते.हे वृत्त प्रदेश काँग्रेस कमिटीत पोहोचताच समितीचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सचिव मुजीब पठाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले व त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. १५ जून पर्यंत या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर आज ६ जून पासून आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

सकारात्मक आश्वासनाने आंदोलन स्थगित

वरील बाबीबाबत जिल्हा ‘काँग्रेस वाचवा’ समितीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात १ जूनपासून बेमुदत साखळी आंदोलन सुरू करण्यात आले. ५ जून रोजी सायंकाळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सचिव मुजीब पठाण,प्रदेश सचिव अमर वराडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी पोहोचून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. ज्यावर विश्वास ठेवून ६ जून पासून आंदोलन तूर्तास स्थगित केले असल्याचे आलोक मोहंती , गोंदिया जिल्हा काँग्रेस महामंत्री यांनी लोकसत्ता शी बोलताना सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress movement district of the state president agitation was suspended sar 75 ysh